Maharashtra Budget Session 2025 – नॅशनल पार्कमधील अपात्र झोपडीधारकांचे ठाणे जिह्यात पुनर्वसन

नॅशनल पार्कमधील वन जमिनीवर अतिक्रमण तर झाले, पण अतिक्रमण होऊ नये यासाठी भिंत बांधल्यानंतरही अतिक्रमण झाले आहे. सरकारने अशांसाठी पहिल्या टप्प्यात 11 हजार 359 कुटुंबांना एसआरएमार्फत चांदिवली येथील संघर्षनगर येथे घरे बांधली आहेत, तर 299 जणांना घरे देणे शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील 13 हजार 486 कुटुंबांना घरे देण्याचा प्रस्ताव आहे, मात्र अपात्रांचे ठाणे जिह्यात पुनर्वसन केले जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) झोपडीधारकांचे पुनर्वसन रखडले आहे. सरकारने त्याबाबत काय पावले उचलली आहेत, घरे कधी मिळणार, पुनर्वसन कसे करणार त्याचबरोबर टीडीआरचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न राजहंस सिंह आणि भाई जगताप यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केला. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यात टीडीआर घोटाळा झाला असेल तर चौकशी करू, असे आश्वासन दिले.

आरे कॉलनीत आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन

नॅशनल पार्कमधील 45 आदिवासी पाड्यांतील दोन हजार कुटुंबांचे आणि पात्र झोपडीधारकांचे आरे कॉलनीतील 90 एकरमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे, मात्र हा भाग पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील आहे. त्यामुळे पालिकेकडून झोनल मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. हा मास्टर प्लॅन तयार झाला की त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती गणेश नाईक यांनी दिली.