Maharashtra Budget Session 2025 – कोकणाला 20 हजार कोटींचे पॅकेज द्या, भास्कर जाधव यांची मागणी

राजकीय अभिनिवेशामुळे कोकण मागे राहिला आहे. पण कोकणचा प्रदेश म्हणजे डॉलर भूमी आहे. कारण कोकणातून मासे व आंबे निर्यात होतात. त्यातून देशाला डॉलर मिळतात. कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. कोकणातील जनतेकडून आदरातिथ्य शिकावे. पण कोकणात मूलभूत आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पाच ते दहा वर्षांसाठी वीस हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी केली.

अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव यांनी कोकणाचा विषय मांडला. कोकणासाठी विमानतळाची मागणी त्यांनी केली कोकणासाठी रेल्वेची संख्या कमी केली. चिपी विमानतळ लांब आहे. रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित झाले तर फायदा होईल. कोकणाचा विकास होईल. कोकणातील जनतेला काहीच फुकट नको आहे, पण कोकणातील पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्या. कोकणातील लोकांकडे पर्यटन वाढवण्याचे कौशल्य आहे. त्यामुळे पर्यटनापासून सर्व योजना राबवण्यासाठी पॅकेज देण्याची मागणी भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली.