महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या वर्षी 10 वी व 12वी च्या परिक्षा 10-15 दिवस लवकर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्त संस्थेशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. यावेळी शरद गोसावी यांनी परीक्षांचे वेळापत्रक, पेपर लीक प्रकरणे यांसारख्या गोष्टींवर भाष्य केलं. दरम्यान 10 वी आणि 12 वी च्या दोन्ही परीक्षा 10 ते 15 दिवस लवकर घेतल्या जातील असे ते म्हणाले. जेणे करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि त्याबद्दलचा विचार करण्यासाठी वेळ मिळू शकेल, असे ते म्हणले. तसेच यामागील इतर कारणाचेंही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
आम्ही दोन्ही परीक्षा नेहमीपेक्षा 10- 15 दिवस आधी सुरू करत आहोत. अनेक HSC चे विद्यार्थी (JEE), (NEET) यांसारख्या स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करतात. मात्र उशिरा परीक्षा झाल्यामुळे पुढील अभ्यासाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे बोर्डाने जर लवकर परीक्षा घेतल्या तर त्यांना पुढील परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी त्याच्या अभ्यासाठी वेळ मिळू शकतो, असे शरद गोसावी यावेळी म्हणाले.
दरम्यान SSC परीक्षेनंतर इयत्ता 11 मध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच HSC नंतर उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर इतर संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठीही पुरेसा वेळ मिळतो. 10 वी – 12 वी परीक्षा लवकर झाल्या तर निकालही लवकर लागतील. त्यामुळे आम्हाला पुरवणी परीक्षा लवकर सुरू करता येतील. तसेच या परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश करता येईल, अशी महत्त्वाची माहिती यावेळी शरद गोसावी यांनी दिली.