दिल्लीतील कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने जिंकलेले सुवर्ण पदक भाजपने पळवले! विजेता असूनही दिले ब्राँज

महाराष्ट्रातील लाखो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणारे उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवणाऱ्या भाजपने आता तर हद्दच केली आहे. दिल्लीमध्ये भाजपकडून आयोजित केलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने मोठ्या मेहनतीने जिंकून मिळवलेले सुवर्ण पदक न देता ब्राँझ पदक दिल्याने खेळाडूंनी मैदानावरच ठिय्या मांडत आंदोलन केले. भाजपच्या या पळवापळवीचा महाराष्ट्रासह क्रीडा विश्वातून धिक्कार केला जात आहे.

दिल्लीतील भाजप नेते वीरेंद्र सचदेवा यांच्या वतीने सीडब्ल्यूजी स्पोर्टस कॉम्प्लेक्स अक्षरधाम येथे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशातील अनेक संघांनी सहभागी होत प्रतिसाद दिला. यामध्ये महाराष्ट्रातील संघाने जोरदार कामगिरी करीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. मात्र प्रत्यक्षात बक्षीस वितरणाप्रसंगी चक्क ब्राँझ पदक दिल्याने खेळाडूंचा अपमान झाला. भाजपच्या या वर्तनामुळे महाराष्ट्राबद्दल असणारी असुयादेखील पुन्हा एकदा समोर आली. याचा तीव्र निषेध करीत संपूर्ण संघ आणि व्यवस्थापनाने मैदानावरच ठिय्या मांडला. जोपर्यंत कष्टाने जिकेलेले सुवर्णपदक दिल्याशिवाय मैदान सोडणार अशी भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते.