ड्रामा, गंभीरता अन् हास्य फवारे… विधान भवनात रंगला नवनिर्वाचित आमदरांचा शपथविधी

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. अशातच राज्यात विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाची सुरुवात आज नाट्यमय, गंभीरता अन् हास्य फवाऱ्यांनी झाली आहे. आज सर्व नवनिर्वाचित 288 आमदार शपथ घेणार होते. मात्र 173 आमदारांनीच शपथ घेतली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी या विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकला.

ईव्हीएम छेडछाड आणि सरकारवर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, ”आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, आमच्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही. हा जनादेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण कुठेही लोकांनी हा विजय साजरा केला नाही. आम्हाला ईव्हीएमवर शंका आहे.”

दरम्यान, आज ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी प्रोटेम स्पीकर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनीच नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी काही आमदारांनी देवाचं नाव घेत, तर काहींनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. या विशष अधिवेशनात अजित पवार गटाच्या आमदारांनी गुलाबी फेटा घालत एन्ट्री केली.

कोणाला किती खाती मिळणार?

विशेष आधिवेशनादरम्यन, आज महायुती सरकाराच्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत जोरदार चर्चा रंगली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला 21-22 मंत्रीपदे मिळतील, तर मिंधे गटाला 11-12 आणि अजित पवार गटाला 9-10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. तसेच सत्तेची धुरा भाजपकडे असल्याने एकनाथ शिंदे यांना वजनदार खाती मिळवण्यासाठी झगडावे लागू शकते.