पहिल्याच दिवशी ठाण्यात 324 तर पालघरमध्ये 88 उमेदवार इच्छुक; 412 जणांनी घेतले अर्ज

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होताच पहिल्या दिवशी ठाणे जिल्ह्यात 324 तर पालघर जिल्ह्यात 88 जण इच्छुक असल्याचे दिसून आले. एकूण 412 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले असून अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत 29 ऑक्टोबर आहे. रायगड जिल्ह्यातून मात्र एकाही अर्जाची विक्री झाली नाही. अर्ज घेण्यासाठी आठवडाभराचा कालावधी असून इच्छुकांची लगबग आजपासून सुरू झाली आहे, तर निवडणूक यंत्रणादेखील ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज आहे.

ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ असून ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा-भाईंदर आणि कळवा-मुंब्रा या पाच विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी पहिल्या दिवशी 324 अर्ज घेतले आहेत. त्यापैकी राईट टू रिकॉल पार्टीचे उमेदवार यक्षीत पटेल, अपक्ष प्रफुल्ल नानोटे, गुरू सूर्यवंशी यांनी आपला अर्ज दाखल केला. उद्यापासून अर्जविक्री व दाखल करण्याची प्रक्रिया आणखी वेगाने होईल असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

■ रायगड जिल्ह्यात आज एकाही उमेदवारी अर्जाची विक्री झाली नाही.
■ पालघर जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांनी 88 अर्ज घेतले असून त्यापैकी एकही अर्ज दाखल झालेला नाही.