Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुकांची गर्दी

सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून आज 261 जणांनी तब्बल 398 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पहिल्याच दिवशी करमाळ्यात दोन, तर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष, राईट टू रिकॉल पार्टी आणि एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे.

सोलापूर जिह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांत आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 261 उमेदवारांनी तब्बल 398 अर्ज नेले आहेत. यात सर्वाधिक सोलापूर शहर 36, करमाळा 31 आणि माळशिरस राखीवमधील 30 व्यक्तींचा समावेश आहे. अर्ज विक्रीबरोबरच पहिल्याच दिवशी करमाळ्यात अशोक ज्ञानदेव वाघमोडे (रा. निलज), बाळासाहेब मच्छिंद्र वेळेकर (रा. निंभोरे) आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात युवराज चंद्रकांत लिंबोळे (रा. बुधवार पेठ) यांनी राईट टू रिकॉल पार्टीच्या वतीने अर्ज दाखल केले.

मतदारसंघनिहाय अर्ज खरेदी केलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे (कंसात एकूण अर्ज विक्री संख्या) ः करमाळा 31 (54), माढा 20 (28), बार्शी 14 (20), मोहोळ (राखीव) 15 (31), सोलापूर शहर उत्तर 16 (26), सोलापूर शहर मध्य 36 (60), अक्कलकोट 12 (20), सोलापूर दक्षिण 29 (47), पंढरपूर 29 (41), सांगोला 29 (51), माळशिरस 30 (20).

पंढरपुरात 41 अर्जांची विक्री

पंढरपूर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. 22) प्रसिद्ध करण्यात आली असून, नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीदेखील सुरू झाली आहे. मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यास आज प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 41 नामनिर्देशन (उमेदवारी अर्ज) पत्रांची विक्री झाली आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पहिल्याच दिवशी 41 उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आलेली आहे. मात्र, या निवडणुकीत प्रमुख दावेदार असलेल्या उमेदवारांनी अर्ज घेतलेले नाहीत, असे सांगण्यात आले.

अहिल्यानगरमध्ये 357 अर्जांची विक्री; चौघांचे अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज इच्छुक उमेदवारांनी 357 अर्जांची खरेदी केली आहे. यापैकी आज पहिल्या दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी ऐनवेळी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दि. 24 व 28 या दोन तारखा अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी ठरविल्या आहेत.

मतदारसंघनिहाय अर्ज खरेदी केलेल्या व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे (कंसात एकूण अर्ज विक्री संख्या) ः नगर शहर 38 (37), अकोले 8 (8), कर्जत-जामखेड 9 (18) अर्ज दाखल (1), श्रीगोंदा 19 (35), कोपरगाव 27 (39), पारनेर 8 (19), श्रीरामपूर 24 (56), संगमनेर 11 (25), शिर्डी 14 (23), नेवासा 20 (41), शेवगाव 18 (46), अर्ज दाखल (3), राहुरी 20 (29).

साताऱ्यात सहा अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज पहिल्याच दिवशी सातारा जिह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी जिह्यातील फलटण व कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन, तर सातारा व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

कोल्हापुरात एकही अर्ज दाखल नाही

विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी जिह्यातील दहा मतदारसंघांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली. मंगळवारपासून (दि. 15) विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे.