‘दादां’चे काय होणार? शिगेला भिडलेली उत्सुकता आज संपणार

पुणे जिह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून जिह्यातील दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह विद्यमान जिह्यातील सर्व आमदार, त्याचबरोबर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.

वाढलेला मतदानाचा टक्का आणि चुरशीच्या लढती, त्याचबरोबर नाराजी या सगळ्या घटकांमध्ये फिरलेल्या या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता उद्या संपणार आहे. बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे योगेंद्र पवार यांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याशिवाय आंबेगावमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील विरुद्ध देवदत्त निकम हा निकालदेखील लक्षवेधी ठरणार आहे.

इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील विरुद्ध आमदार दत्तात्रय भरणे यांच्यातील लढत अटीतटीची झाली. जुन्नर मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत आहे, तर खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते विरुद्ध बाबाजी काळे या लढतीच्या निकालाची मोठी उत्सुकता आहे. कोथरूडमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे चंद्रकांत मोकाटे यांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

जिह्यात जुन्नर, मावळ, इंदापूर, भोर, त्याचबरोबर पर्वती, कसबा या मतदारसंघात अपक्ष उमेदवार ताकतीने निवडणुकीत उतरले होते. त्यांचा फटका कोणाला बसणार… याशिवाय पुरंदरमध्ये काँग्रेस, शिंदे गट आणि अजित पवार गट या तीनही पक्षांचे उमेदवार आमने-सामने असल्याने या निकालाची वाट लोक पाहत आहेत.

ज्या मतदारसंघांमध्ये तिरंगी-चौरंगी लढती होत आहेत त्या ठिकाणी कोण कोणाची मते घेणार याची सर्वाधिक चर्चा आहे. याशिवाय कोण निवडून येणार आणि कोण पडणार यावर पैजादेखील लागल्या आहेत. निकालाचे एक्झिट पोल गेल्या दोन दिवसांपासून सुरू असले तरी प्रत्यक्षात या एक्झिट पोलवर अनेकांचा भरोसा नाही.