वार्तापत्र – कुर्ल्यात निष्ठावान विरुद्ध गद्दार सामना रंगणार

>>बबन लिहिणार

अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव असलेला कुर्ला मतदारसंघ हा निष्ठावान शिवसैनिकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदाची विधानसभा निवडणूक ही ‘निष्ठावान’ विरुद्ध ‘गद्दार’ अशी थेट लढत होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निष्ठावान कार्यकर्त्या प्रविणा मोरजकर यांना तिकीट देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे, तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर यांना पक्षाने पुन्हा एकदा तिकीट दिले आहे.

गेल्या दोन टर्मपासून ते कुर्ल्याचे आमदार आहेत. आमदार म्हणून शासनाची मोठमोठी कामे करण्याऐवजी कुडाळकर यांनी शौचालयाला टाईल्स बसवणे, मैदानाचे सुशोभिकरण करणे अशी नगरसेवकांची कामे करण्यात धन्यता मानली. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही मंगेश कुडाळकर यांच्यासाठी अजिबात सोपी राहिलेली नाही. शिवसेना पक्षाने सर्व काही देऊनही कुडाळकर हे शिंदेच्या गटात गेल्याने लोकांना हे फारसे पटलेले नाही, तर या उलट प्रविणा मोरजकर यांनी नगरसेविका म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. आमदार म्हणून त्यांना संधी दिल्यास त्या मतदारसंघाचा चांगला विकास करतील, अशी अपेक्षा आहे. कुर्ला मतदारसंघाचे तिकीट मिळाल्यापासून प्रविणा मोरजकर यांना विजयी करण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत.

दलित-मुस्लिमांची मते निर्णायक

कुर्ला मतदारसंघात एकूण सात वॉर्ड आहेत. यातील बराच भाग हा झोपडपट्टीबहुल भाग आहे. या मतदारसंघात कुर्ला पूर्व आणि पश्चिमेचा काही भाग, कामगार नगर, चुनाभट्टी, राहुल नगर, सुमन नगर, ठक्कर बाप्पा कॉलनी, वत्सलाताई नाईक नगर, टिळक नगर या भागांत दलित आणि मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. या मतांवरच पुढील आमदार ठरणार आहे.

लोकसभेत दिसली मतांची झलक

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या पारडय़ात कुर्ला मतदारसंघाने भरभरून मते टाकली आहेत. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली होती. वर्षा गायकवाड यांना 67 हजार 620 मते तर, भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना केवळ 51 हजार 328 मते या विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती.

समस्यांचे माहेरघर

कुर्ला मतदारसंघ समस्यांचे माहेरघर बनले आहे. या क्षेत्रात वाहतूक कोंडीच्या समस्येने कुर्लावासीय त्रस्त झाले आहेत. कुर्ल्यातील एलबीएस मार्ग, बीकेसी सिग्नल, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, कुर्ला डेपो, कमानी, कुर्ला स्थानक पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. कुर्ल्यातील अनेक ठिकाणी सखल भागात दरवर्षी पाणी साचते, याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परंतु, या समस्या वर्षानुवर्षे धूळ खात पडून आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला डेअरीची जमीन देण्यात येणार आहे. त्यामुळे कुर्ला येथील या जमिनीवर दुग्धशाळा, कर्मचारी वसाहत, शीतगृह मुख्य इमारत आणि अन्य बांधकामे आहेत. कर्मचारी वसाहतीमध्ये शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्यामुळे ही जागा धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी द्यायची असल्यास येथील अधिकारी आणि कर्मचारी यांची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. धारावी पुनर्विकासासाठी कुर्ला डेअरीचा बळी दिला जात असल्याने नाराजी हेतेय.

मदर डेअरीची जागा कळीचा मुद्दा

कुर्ल्यातील नेहरू नगरमधील 10.4 हेक्टर जागेवरील मदर डेअरीच्या जागेचा मुद्दा कळीचा बनला आहे. या जागेचा वापर धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु कुर्लावासीयांनी याला जोरदार विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात कुर्ल्यातील नागरिक मोठय़ा प्रमाणात रस्त्यांवर उतरले होते. दहा हजार लोकांनी स्वाक्षरी करून ते पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा सार्वजनिक उद्यानासाठी राखीव ठेवावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मदर डेअरीची जागा हा कळीचा मुद्दा ठरणार हे नक्की आहे.