Maharashtra Assembly Election सेलिब्रेटींचे भरभरून मतदान

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. कलाकारांनी मतदानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. अभिनेत्री सुकन्या मोने, सोनाली कुलकर्णी, आर्या आंबेकर, हेमंत ढोमे, रवी जाधव, जुई गडकरी, सायली संजीव, मंदार चांदवडकर, सुनील बर्वे, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या कुटुंबासह मतदान केले. याचे फोटो शेअर करत तिने एक चारोळी केली. ‘करा आज योग्य सिलेक्शन, टुडे इज द डे ऑफ इलेक्शन, समाजात हवं असेल जर परफेक्शन, करू नका या संधी रिजेक्शन’, अशी चारोळी सोनालीने केली.

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हेमंत ढोमेने मतदान केल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे. ‘माझं मत ऐक्यासाठी विकासासाठी, भयमुक्त सुरक्षित वातावरणासाठी! माझं मत शेतकऱयांसाठी, दुर्बल घटकांसाठी! माझं मत जातीय सलोख्यासाठी महाराष्ट्रधर्मासाठी! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी!’ अशी पोस्ट हेमंत ढोमेने लिहिली. अभिनेते सुनील बर्वे यांनीही फोटो शेअर करत मतदानाचे कर्तव्य पार पाडल्याचे सांगितले.

  • माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पत्नी आणि मुलीसोबत मतदानाचा हक्क बजावला.
  • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 91 व्या वर्षी हाजीअली येथील सहकार निवास मतदान पेंद्रात मतदानाचा हक्क बजावला. ‘सुट्टी आहे म्हणून घरी राहू नका. मतदान करा. हा तुमचा हक्क आहे,’ असे त्या म्हणाल्या
  • शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. हा अत्यंत महत्त्वाचा, जबाबदारीचा दिवस आहे. उठा आणि मतदानाला बाहेर पडा, असे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले.
  • क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने पत्नीसोबत मतदान केले.

बॉलीवूड कलाकार मतदानाला उतरले

बॉलीवूडच्या कलाकारांनी मतदान केल्यानंतर आपल्या चाहत्यांना मतदानाचे आवाहन केले. गीतकार जावेद अख्तर, गुलजार, सुभाष घई, शुभा खोटे, माधुरी दीक्षित, सोनाली कुलकर्णी, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, फरहान अख्तर, तमन्ना भाटिया, राजकुमार राव, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, कार्तिक आर्यन, जेनेलिया देशमुख, श्रद्धा कपूर, ईशा देओल, रकुल प्रित, जॅकी भगनानी, तुषार कपूर यांनी मतदान केले आहे. यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.