दिवाळीनंतर पुढच्या आठवडय़ापासून खऱया अर्थाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मंगळवार, 5 नोव्हेंबरपासून झंझावाती प्रचार दौरा सुरू होणार आहे. कोकणातून या दौऱयाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 विधानसभा मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्याच दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर प्रचाराला अवघे 15 दिवस मिळणार असल्याने लगेचच प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेने जोरदार आखणी केली असून 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे झंझावाती दौऱयावर जाणार आहेत. याबाबत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून माहिती देण्यात आली.
5 नोव्हेंबर सायं. 6 वाजता रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा
6 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता भिवंडी ग्रामीण विधानसभा
सायं. 7 वाजता वांद्रे-कुर्ला संकुल मैदान येथील महाविकास आघाडीची सभा
7 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता दर्यापूर विधानसभा
सायं. 5 वाजता बडनेरा विधानसभा
8 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता बुलढाणा विधानसभा
सायं. 5 वाजता मेहकर विधानसभा
सायं. 7 वाजता परतूर विधानसभा
महाविकास आघाडीची बुधवारी बीकेसी मैदानावर विराट सभा
महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ येत्या बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी फुटणार आहे. बीकेसी मैदानावर 6 नोव्हेंबरला महाविकास आघाडीची विराट सभा होणार आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.