वडाळ्यात बाऊन्सर्सची दहशत

वडाळा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवाराने किडवाई नगरमध्ये बाऊन्सर्स उतरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. या भागातील मुस्लिम मतदार मोठय़ा संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते. किडवाई नगरमध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बूथवर बसले होते. त्यावेळी काळे सफारी घातलेले चार बाऊन्सर्स बूथजवळ आले आणि आसपास फिरू लागले. कार्यकर्त्यांनी बाऊन्सर्सना जाब विचारला, पण तरीही ते बाऊन्सर्स हटत नव्हते. अखेर गस्तीवरील पोलीस मोटारसायकवरून आले आणि त्यानंतर बाऊन्सर्स निघून गेले. इतर ठिकाणी शांतपणे मतदान होते. ज्ञानेश्वर विद्यालयात मतदानासाठी आलेल्या नवमतदारांची उपस्थिती लक्षणीय होती. असद अली याने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. वडील आणि बहिणीसोबत मतदान केल्यानंतर त्याच्या चेहऱयावरचा आनंद गगनात मावत नव्हता. तर्जनीवर लावलेली शाई दाखवत काढलेले फोटो त्याने इन्स्टाग्रामवर टाकला.

प्रतीक्षानगरमध्ये रांगा

प्रतीक्षानगरमधील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यासंकुलातील मतदान केंद्रात रांगा लागल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी याच मतदान केंद्रात मतदान अतिशय संथगतीने सुरू होते. त्याचीच आज पुनरावृत्ती झाल्याचा मतदारांचा आरोप आहे. निखिल भंडारे याला मतदानासाठी दोन तास लागले अशी त्याने तक्रार केली. या मतदान केंद्रावरील बूथ क्रमांक सतराच्या बाहेर मोठी रांग लागली होती. दोन ते तीन तास आम्हाला मतदानासाठी रांगेत उभे राहावे लागले. अभिषेक तिवारी आणि त्याची आई तीन तास रांगेत उभे होते. रांगांमुळे मतदार कंटाळले होते. आनंद गंगाराम मोतकूट यांनीही हीच तक्रार केली. या मतदारसंघातील इतर मतदान केंद्रात व्यवस्थित मतदान सुरू होते.

वरळी, शिवडीत दुपारनंतर मतदानाला वेग

दक्षिण मुंबईतील शिवडी, वरळी आणि भायखळा विधानसभा मतदारसंघातील मतदानाला सकाळपासून चांगला प्रतिसाद लाभला होता. दुपारच्या सुमारास अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या नगण्य होती. 11 वाजेपर्यंत सरासरी 16 टक्के मतदान नोंदले गेले. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यानंतर पुन्हा मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारी 3 ते 5 यादरम्यान मतदानाची टक्केवारी वेगाने वाढली.

विक्रोळी, मुलुंड आणि भांडुपमध्ये शांततेत मतदान झाले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगा पुढे सरकत होत्या. कुठेही गोंधळाचे, ईव्हीएम बिघाडाचे किंवा नावे न सापडण्याचे प्रकरण दिसले नाही. पोलीस बंदोबस्त अतिशय चोख होता. 100 मीटर परिसरात पत्रकारांनाही थांबण्याची परवानगी नव्हती. मतदान केंद्रावर जाताना मोबाइल असले तर तो बंद करून ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत होत्या.