उद्यापासून फुटणार प्रचाराचे फटाके, जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेच्या शिलेदारांचे उमेदवारी अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत बहुतांश उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मुंबई, ठाणे, रायगडात शिवसेनेच्या शिलेदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत वाजतगाजत आपले अर्ज दाखल केले. मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार… आता थकायचे नाही, भगवा फडकेपर्यंत थांबायचे नाही, अशी गर्जना करत यावेळी प्रत्येक उमेदवाराने शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या विजयाची खात्रीही व्यक्त केली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून बुधवारपासून ऐन दिवाळीत प्रचाराचे फटाके फुटणार आहेत.

पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेना व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भव्य रॅली काढत अर्ज भरायला जात असताना वरुण सरदेसाई यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. निवडणुकीनिमित्त पडद्यावर आलो असलो तरी गेली 15 वर्षे पडद्यामागून संघटनेत काम करतोय असे सांगतानाच, वांद्रे पूर्वची जनता सुशिक्षित उमेदवाराची वाट बघत होती आणि ती शिवसेनेला चांगला प्रतिसाद देईल, असेही वरुण सरदेसाई म्हणाले.

शिवसेनेचे सुनील राऊत यावेळी तिसऱ्यांदा विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. आज त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीमधील प्रचंड गर्दी पाहून हा गद्दारांना संपविण्यासाठी जमलेला जनसागर आहे, अशा भावना सुनील राऊत यांनी व्यक्त केल्या. गेली अडीच वर्षे मिंधे सरकारने छळ केला, महाराष्ट्राची जनता 23 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार बसवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

शिवसेना उमेदवार महेश सावंत यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन माहीम विधानसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. राजा बढे चौकातील शिवसेना शाखा क्रमांक 191 येथून सावंत यांची वाजतगाजत रॅली काढण्यात आली. अॅण्टोनियो डिसिल्व्हा हायस्कूलमधील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, उपनेत्या विशाखा राऊत, उपनेते मिलिंद वैद्य, माजी महापौर महादेव देवळे, राजन नाईक, शाखाप्रमुख अभय तामोरे, दीपक वाघमारे उपस्थित होते.

विलेपार्ले पूर्व येथून शिवसेना उमेदवार संदीप नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते अॅड. अनिल परब, माजी नगरसेविका विनी डिसोझा, माजी नगरसेवक प्रदीप वेदक, राजू नाईक, विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर उपस्थित होते. दिंडोशी मतदारसंघातून सुनील प्रभू यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  यावेळी उपनेते अमोल कीर्तिकर उपस्थित होते.

शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्या रॅलीत हजारो शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. अजय चौधरी यंदा शिवडीतून हॅट्ट्रिक करतील असा शिवसैनिकांना विश्वास आहे. यावेळी चौधरी यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, सुधीर साळवी उपस्थित होते.

मलबार हिल मतदारसंघातून अॅड. भैरू चौधरी जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक, माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, विधानसभा संघटक अरविंद बने, विधानसभा सहसंघटक सुरेखा उबाळे, विधानसभा समन्वयक शिवाजी राहणे आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची घाई झाली आहे. आजप्रमाणे उद्याही सर्वत्र अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन आणि मिरवणुकांचा दणदणाट पाहायला मिळणार आहे. 30 तारखेला अर्जांची छाननी होऊन वैध अर्ज जाहीर होतील. 4 नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

विधानसभेसाठी 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर शुभमुहूर्त पाहून अनेक उमेदवार अर्ज भरत आहेत. गुरुपुष्यामृत  योग साधून 24 ऑक्टोबर रोजी अनेक दिग्गजांनी अर्ज भरले. आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्तही बहुतांश उमेदवारांनी साधला. आतापर्यंत 4247 अर्ज दाखल झाले आहेत.