महाड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप आणि महायुतीचे भरत गोगावले यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. शिवसेनेशी गद्दारी करून खोक्यांसाठी मिंधे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांच्याविरोधात क्रांतिभूमी महाडमध्ये आजही संतापाची भावना आहे. त्यामुळे महाडकर गद्दारीला धक्क्याला लावून परिवर्तन घडवतील, असेच गावागावात वातावरण असून स्नेहल जगताप यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
मंत्रीपदासाठी गोगावले यांनी गद्दारी केली. मात्र अखेरपर्यंत त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. निवडणुकीच्या केवळ एक महिना आधी त्यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर बोळवण केली. मंत्रीपदाभोवती फिरण्यातच गोगावलेंचा सर्वाधिक वेळ गेल्याने महाडच्या विकासाचे तीनतेरा वाजले. विकास नाहीच उलट भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांचा प्रत्येक विकासकामात आणि शासकीय कामात हस्तक्षेप असतो. त्यामुळे त्यांच्या दादागिरी आणि भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात मतदार मतयंत्रातून उत्तर देण्याच्या तयारीत आहेत.
अनेक संघटनांनीही स्नेहल जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यातच महाड विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता सलग तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलेला उमेदवार चौथ्यादा निवडून येत नसल्याने या मतदारसंघात परिवर्तन घडेल अशी चर्चा आहे. याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या महाडसह पोलादपूरमध्ये झालेल्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता महाड विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांना पहिल्या महिला आमदार होण्याची संधी आहे.
नव्या अध्यायाची नांदी
स्नेहल जगताप यांनी नगराध्यक्षा म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सर्वसमावेश आणि लोकहिताची कामे करण्यासाठी निवडून द्या, असे प्रचारादरम्यान आवाहन करत त्यांनी महाड मतदारसंघातील गाव, वाड्या, वस्ती पिंजून काढली आहे. दिवंगत माजी आमदार माणिक जगताप यांना मानणारा वर्गही मोठा आहे. स्नेहल जगताप निवडून येऊन महाडमध्ये नवा अद्याय लिहिला जाईल, अशी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठामपणे खात्री देत आहेत.
केवळ ठेकेदारांचे हित
विकासाचा अनुशेष भरून काढण्यात आमदार भरत गोगावले फेल ठरले आहेत. केवळ ठेकेदारांचे हित बघितले जात असल्याने पाणी, रस्ते, आरोग्याचे प्रश्नही सुटलेले नाहीत. मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. हप्तेखोरीमुळे एमआयडीसीतून अनेक कंपन्या स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे तरुणांना नोकरीसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे गोगावले यांना सुट्टी देण्याच्या तयारीत सर्वच घटक असल्याचे वास्तव आहे.