माहीममध्ये मनसेकडून आचारसंहितेचा भंग, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाला मुंबई महानगरपालिकेकडून नियमबाह्य परवानगी दिली गेली असून हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे शिवसेनेने आज तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

शिवसेना नेते-खासदार व पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची यासंदर्भात आज भेट घेतली व आचारसंहिता असतानाही पालिकेच्या परवानगीने होत असलेल्या राजकीय पक्षाच्या दीपोत्सवावर आक्षेप घेतला. याबाबत त्यांनी निवेदनही दिले.

– विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तरीही महापालिकेने आपल्या अखत्यारितील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या सार्वजनिक स्थळावर दीपोत्सव साजरा करण्याची मनसेला परवानगी दिली आहे, असे नमूद करत शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे.

– या दीपोत्सवासाठी मनसेने सर्वत्र बॅनर, गेट आणि कंदील लावले आहेत. आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक मालमत्तेचे असे विद्रुपीकरण करणे हा नियमभंग आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

– उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाची निर्देश पुस्तिका आहे. त्यातील निर्देशांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. त्या पुस्तिकेतील निर्देशांवर बोट ठेवत शिवसेनेने मनसेच्या प्रचारकी दीपोत्सवाला आक्षेप घेतला आहे.

शिवाजी पार्कवर दीपोत्सवाला पालिकेकडून नियमबाह्य परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील दीपोत्सवाच्या उद्घाटनावेळी माहीम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे उपस्थित होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या कार्यक्रमाच्या संपूर्ण खर्चाचा अंतर्भाव अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात करण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर राजकीय पक्षाच्या प्रचाराला बेकायदेशीर परवानगी दिल्याबद्दल महापालिका व अन्य संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱयांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात यावेत अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.