मिंध्यांनी धर्मवीर चित्रपट काढून ठाणेकर जनतेची दिशाभूल करीत स्वतःचे मार्केटिंग केले. आता विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत थेट धर्मवीरांची गाडीच उतरवली आहे. ही गाडी ठाण्यात विविध ठिकाणी फिरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्मवीरांच्या नावाचा वापर करून मिंधे भावनिक आवाहन करीत आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपटानंतर आता त्यांच्या गाडीचा वापर म्हणजे मते मिळवण्यासाठी मिंध्यांचा ‘शो’ असल्याची संतापजनक प्रतिक्रिया ठाणेकर मतदारांमध्ये उमटू लागली आहे.
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार केदार दिघे कडवी झुंज देत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड देण्याचा निर्धार करत केदार दिघे यांनी प्रचाराचा वेग वाढवतच कासावीस झालेल्या मिंध्यांनी सहानुभूती व भावनिक प्रचाराला सुरुवात केली आहे.
राज्यात विकासकामांचा धडाका लावल्याचा गाजावाजा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघात कोणतीही विकासकामे न केल्याने आता निवडणूक लढवायची कोणत्या मुद्यावर, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे मतदारांना भावनिक साद घालण्यासाठी या मिंध्यांनी धर्मवीरांच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत पक्षाशी गद्दारी करायची नाही हे दिघेसाहेबांचे तत्त्व आणि शिकवण. दिघेसाहेबांच्या तत्त्वाशीच गद्दारी करणारे आज दिघेसाहेबांच्या फोटोसोबतच त्यांनी वापरलेली गाडी स्वतःच्या प्रचारासाठी वापरतात. दिघेसाहेबांच्या अशा अनमोल वस्तू रस्त्यावर आणून त्याचे राजकीय स्वार्थासाठी आणि मते मागण्यासाठी प्रदर्शन करणाऱ्या मानसिकतेचा मी जाहीर निषेध करतो.
केदार दिघे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)