‘ना बटीये, ना कटीये, सब मिलकर भाजपा को रपटीये’, भाजपविरोधात ‘आप’ आक्रमक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ‘आप’ लढवत नसला तरी ‘आप’ने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह घटक पक्षांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी ‘आप’चा प्रत्येक स्वयंसेवक महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून ‘ना बटीये, ना कटीये, सब मिलकर भाजप को रपटीये’ असे आवाहन ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी केले.

महाराष्ट्र सरकार हे असंविधानिक सरकार आहे.  भ्रष्टाचार, घोडेबाजार आणि फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण याच्या आधारे सरकार बनवले गेले आहे. त्यामुळे आमचा या सरकारला विरोध असल्याचे खासदार संजय सिंह म्हणाले. हे सरकार महाराष्ट्र विरोधी सरकार आहे.  नरेंद्र मोदी महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक देतात. आम आदमी पक्ष पंतप्रधानांना आठवण करून देऊ इच्छितो की ते देशाचे आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रासाठी असलेले जवळपास 2 लाख कोटींचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आले आहेत.  बेरोजगारीच्या संकटामुळे तरुणांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात होत आहेत.  महाराष्ट्राला नेहमी सावत्र वागणूक देणारे हे सरकार गेलेच पाहिजे, असेही खासदार सिंह म्हणाले. 10 वर्षे पंतप्रधान पदावर राहूनही पंतप्रधान ‘एक है तो सेफ है’ असे म्हणत आहेत, मग एवढी वर्षे पंतप्रधान मोदी काय करत होते असा सवाल करतानाच ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असे ते म्हणाले.