गेली 30 ते 34 वर्षे मी सांगोला विधानसभा मतदारसंघात 24 तास काम करत आहे. येथील प्रत्येक गावातील वाडीवस्तीवर माझा जनसंपर्क आहे. लोकांच्या अडचणी, व्यथा आणि वेदना यांची परिपूर्ण जाणीव आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आगामी 50 वर्षांचे विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर आहे. यंदा विकासाच्या मुद्द्यावर सांगोला विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला.
सांगोला शहरातील ग्रामदैवत अंबिकादेवीचे दर्शन घेऊन मंगळवारी महाविकास आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, जनतेच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उभा राहिलो आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेव ठाकरे) पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर करून विजयाची मशाल हातात दिली. त्यांनी सांगितल्यामुळेच गेल्या निवडणुकीत मित्राला आमदार केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी आठवण ठेवली पण मित्राने ठेवली नाही. शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी कार्यकत्यांची गर्दी वाढत आहे. आमदार झाल्यावर रोजगार निर्मितीसाठी पाच एमआयडीसी आणून तालुक्यात उद्योग उभा करण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार डॉ. राम साळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, तानाजीकाका पाटील, तालुकाप्रमुख अरविंद पाटील, तुषार इंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, अजित देवकते, नितीन खाडे यांची भाषणे झाली.
यावेळी जयमाला गायकवाड, साईनाथ अभंगराव, माजी आमदार डॉ. राम साळे, संभाजीराजे शिंदे, प्रा. पी. सी. झपके, डॉ. धनंजय पवार, कमरूद्दिन खतीब, नंदकुमार दिघे, संतोष पाटील, विजय येलपले, शाहूराजे मेटकरी, अनिल खडतरे, अजयसिंह इंगवले, तोहिद मुल्ला, विरा पुकळे, फिरोज मणेरी, शिवाजीराव जावीर, आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा काहीही संबंध नाही
शेतकरी कामगार पक्षाचे स्वयंघोषित उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांचे समर्थक हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा चुकीचा प्रचार सांगोला विधानसभा मतदारसंघात करत आहेत. परंतु, त्यांचा आणि महाविकास आघाडीचा काडीचाही संबंध नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने मतदारांची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक असा प्रयत्न केला जात असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार आणि शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अरविंद पाटील यांनी स्पष्ट केले.