विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
टिळक भवन येथे चेन्नीथला यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदाही महाविकास आघाडीलाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्रिशंकू विधानसभेचा प्रश्न उद्भवत नाही. निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेस पक्षाने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे का? यावर बोलताना, काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीतही पक्षासोबत राहिले आहेत. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.