महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. ही पत्रकार परिषद जवळपास तासभर (53 मिनिटे) चालली.
निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक घेण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बऱ्याच मतदान केंद्रांवर व्होटिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याचे प्रकार समोर आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणूक एकाच टप्प्यात होणार का? आणि व्होटिंग मशिनमधील बिघाडाबाबत आयोग पत्रकार परिषदेत काय माहिती देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात आम्ही सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यात सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष होते. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व यंत्रणा, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मतदान केंद्रांवरील व्यवस्था आणि सुविधा पुरण्याशीसंबंधीत सर्व यंत्रणांशी चर्चा केली, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
बसपा, आप, माकप, काँग्रेस, मनसे, अजित पवार गट, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), असे एकूण 11 राजकीय पक्षांनी आम्ही चर्चा केली. दिवाळी आणि देव दिवाळी, तसेच छट पूजाही आहेत. सणासुदीचा काळ आहे. ते लक्षात ठेवून निवडणुकीच्या तारखांची घोषणा करावी, अशी सूचना राजकीय पक्षांनी केली. तसेच आठवड्याच्या मधल्या दिवशी मतदान ठेवावे. शहरी भागातील जी मतदान केंद्रं आहेत तिथे मतदान करताना असुविधांचा सामना करावा लागू नये, अशी व्यवस्था करावी. बऱ्याच ठिकाणी मतदारांच्या रांगा लागतात, पाणीही प्यायला मिळले नाही, असे प्रकार लोकसभा निवडणुकीवेळी घडल्याचे राजकीय पक्षांनी सांगितले. मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी आहे. मात्र, मतदारांनी मोबाईल आणल्यावर तो ठेवणार कुठे असा प्रश्न पडतो. त्यामुळे मोबाईल ठेवण्याबाबत मार्ग काढावा किंवा योग्य व्यवस्था करावी, अशा मागण्या राजकीय पक्षांनी केल्याचे आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या सर्व गोष्टींवर आयोगाने विचार केला आहे. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करू, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.