वार्तापत्र (पालघर) – निष्क्रिय गावितांचा मतदार करणार करेक्ट कार्यक्रम; निष्ठावंत दुबळांना पसंती

कधी भाजप, शिवसेना तर कधी मिंधेवासी अशा कोलांटउड्या मारणारे राजेंद्र गावित हे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, यापूर्वी मंत्री, खासदार, आमदार अशी अनेक पदे भूषवूनदेखील त्यांनी पालघर विधानसभा मतदारसंघात कोणतेही मोठे प्रकल्प आणले नाहीत. या क्षेत्राचा कोणताच विकास झाला नाही. अशा निष्क्रिय गावितांचा करेक्ट कार्यक्रम मतदार करणार आहेत. तर निष्ठावंत असलेले जयेंद्र दुबळा यांना मतदारांची पसंती मिळत असून त्यांना स्थानिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

पालघर विधानसभा मतदारसंघांमध्ये दलबदलू अशी राजेंद्र गावित यांची प्रतिमा असून त्यांच्या विरोधात किनारपट्टी भागात रोष निर्माण झाला आहे. येथून बंडखोरी केलेले भाजपचे अमित घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महाविकास आघाडीचे जयेंद्र दुबळा व मिंध्यांचे उमदेवार राजेंद्र गावित यांच्यात खरी लढत आहे. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने निष्ठावान शिवसैनिक जयेंद्र दुबळा यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यामुळे तर दुसरीकडे भाजपमधून मिंध्यांनी आयात केलेले उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विरोधात महायुतीत खदखद असल्याने त्यांचा पराजय अटळ मानला जात आहे.

काळे झेंडे दाखवले

किनारपट्टीलगतचा मच्छीमार समाज, कुणबी, वाडवळ, भंडारी अशा अनेक समाजातील अनेकांनी जयेंद्र दुबळा यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय ते घरोघरी जाऊन स्थानिकांचे प्रश्न समजावून घेत आहेत. याउलट गावित यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये तीव्र विरोध व संताप दिसून येत आहे. किनारपट्टी भागात मुरबे बंदरला विरोध असलेल्या नागरिकांनी तर गावित यांच्या प्रचार रथाला शुक्रवारी पिठाळून लावले. एवढेच नव्हे तर त्यांना काळे झेंडेदेखील दाखवले. वाढवण व परिसरातील भूमिपुत्रांच्या रोषाला गावितांना ऐन प्रचारात सामोरे जावे लागणार आहे.

नाराजीचा फटका बसणार

विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलून दलबदलू राजेंद्र गावित यांना मिंध्यांनी आयात केले त्यामुळे नाराज वनगा यांनी मिंध्यांची पोलखोल केली. ही पोलखोल करीत असताना ते प्रसारमाध्यमांसमोर अक्षरशः घाय मोकलून रडले. या नाराजीचा मोठा फटका राजेंद्र गावित यांना बसणार असल्याची मतदारसंघात चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्या पाठीशी ठाम असून मिंध्यांना भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागत आहेत. एकंदरीत पालघरमधील लढत व मिंध्यांविरोधातील नाराजी तसेच संताप लक्षात घेता मतदार शिवसेनेचे जयेंद्र दुबळा यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

वार्तापत्र (कलिना) – कलिनात शिवसेना हॅटट्रिक साधणार

दुबळा यांना प्रश्नांची जाण

शिवसेनेचे निष्ठावान उमेदवार जयेंद्र दुबळा हे कृषी पदवीधर असून त्यांनी गाव पातळीवर ग्रामसेवक म्हणून काम केले आहे. परिसरातील समस्या ते योग्य प्रकारे जाणत असून निवडून आल्यास येथील समस्या मार्गी लावण्याचे वचन त्यांनी दिले आहे. त्यामुळे दुबळा यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. मिंधे गटाचे राजेंद्र गावित यांची महायुतीत बिघाडी झाल्याने त्यांना भाजपची साथ लाभणार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना एकेका मतासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सरकारने केलेली कामे स्वतःच्या नावावर खपवून आयते फोटो काढण्याच्या प्रतापामुळे त्यांच्यावर पालघरवासीयांनी याआधीही नाराजी व्यक्त केली गेली होती. त्यामुळे गावित यांना पुन्हा नंदुरबारच्या एसटीत बसवून त्यांचे पार्सल गावाला पाठवून देण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.