निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही; भाजपच्या बंडखोर स्नेहा पाटील यांच्या गोदामांवर कारवाईचा बुलडोझर

निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही म्हणून मिंधे गटाने आता भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुडाचे राजकारण सुरू केले आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवार स्नेहा पाटील यांच्यामुळे मिंध्यांचे शांताराम मोरे धोक्यात आले आहेत. त्यामुळे स्नेहा पाटील यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएने मंगळवारी सायंकाळी अचानक पाटील यांच्या काल्हेर येथील गोदामांवर कारवाईचा घाट घातला.

बुलडोझरचा ताफा घेऊन एमएमआरडीएचे पथक गोदामावर चालून आले. विशेष म्हणजे ही कारवाई करण्यासाठी कोणतीही नोटीस एमएमआरडीएने स्नेहा पाटील यांना दिली नव्हती. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही मिंधे गटाकडून या पद्धतीने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याने मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे महादेव घाटाळ, मिंधे गटाचे शांताराम मोरे आणि भाजपच्या बंडखोर स्नेहा पाटील अशी तिरंगी लढत होत आहे. स्नेहा पाटील यांच्या बंडखोरीचा मिंधे गटाला जोरदार फटका बसणार आहे. त्यामुळे मिंधे गट सुरुवातीपासून पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र पाटील या निवडणूक लढवण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम राहिल्या. त्यांनी प्रचारही सुरू केला. त्यामुळे मिंधे गटाचे पित्त खवळले. सोमवारी माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पाटील यांच्या काल्हेर येथील गोदांमावर कारवाई करण्याचा घाट एमएमआरडीए प्रशासनाने घातला.

कोणतीही नोटीस न देता एमएमआरडीएचे पथक बुलडोझरचा ताफा घेऊन पाटील यांच्या गोदामांवर कारवाई करण्यासाठी काल्हेरमध्ये आले. या सूडनाट्याची माहिती स्थानिक रहिवाशांना मिळाल्यानंतर त्यांनी गोदामांजवळ धाव घेतली. शेकडो ग्रामस्थ पाटील यांच्या गोदामाजवळ जमा झाल्यामुळे एमएमआरडीएच्या पथकाला तेथून काढता पाय घ्यावा लागला. कारवाई न करताच पथक परत गेले. या दडपशाहीमुळे खोके सरकारच्या विरोधात मतदारांमध्ये चीड निर्माण झाली आहे.

मिंधेंनी सूडबुद्धीतून कारवाई केली

आमच्या वडिलोपार्जित जमिनीवरील ही तीन गोदामे 1999 मध्ये बांधण्यात आलेली आहेत. त्यावेळी भिवंडी ग्रामीणमधील हा भाग एमएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रात नव्हता. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश एमएमआरडीए क्षेत्रात 2009 मध्ये करण्यात आला. त्यानंतर उभ्या राहिलेल्या बांधकामांसाठी त्यांची परवानगी आवश्यक होती. मात्र आमच्या गोदामावर झालेली ही कारवाई फक्त बेकायदाच नाही तर सूडबुद्धीतून झाली आहे, अशी प्रतिक्रिया स्नेहा पाटील यांनी व्यक्त केली आहे.