Maharashtra Assembly Election 2024 – मतदान हा प्रत्येकाचा अधिकार, कोणीही वंचीत राहू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना अवाहन

लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज बैठक घेतली. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यापासून ग्रामस्थांनी स्वत: वंचित राहू नये व इतरांनाही वंचित रहावे लागेल असे कुठलेही कृत्य करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी सिंह यांनी कोत्रेवाडी ग्रामस्थांची आज आपल्या दालनात बैठक घेतली. नगरपालिका प्रशासन अधिकारी तुषार बाबर, लांजा मुख्याधिकारी हर्षला राणे, मंगेश आंबेकर यांच्यासह कोत्रेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. लांजा नगरपंचायतींनी सुरू केलेली घनकचरा व्यवस्थापनबाबत कोत्रेवाडी येथील जागा. खरेदीची प्रक्रिया ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प हानिकारक होऊ शकतो. त्यासाठी ग्रामस्थांचा येत्या निवडणुकीवर बहिष्कार आहे, असे मत आंबेकर यांनी मांडले.

जिल्हाधिकारी सिंह यांनी मुख्याधिकारी लांजा यांनी हे प्रकरण नियमानुसार पुन्हा तपासून घेण्याचे निर्देश दिले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने ग्रामस्थांनीही न्यायालयाकडे आपली बाजू अधिक स्पष्टपणे मांडून कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यापासून ग्रामस्थांनी स्वत: वंचित राहू नये व इतरांनाही वंचित रहावे लागेल, असे कुठलेही कृत्य करू नये. तसे आढळून आल्यास प्रशासनामार्फत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.