विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त साधत महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत खऱया अर्थाने ‘मतत्रयोदशी’ साजरी केली. जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, निशाणी मशाल विजय विशाल अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणू सोडला. ढोलताशांच्या गजरात भगवे झेंडे फडकवत निघालेल्या उमेदवारांच्या भव्य मिरवणुकांमुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र भगवामय वातावरण झाले होते.
जोगेश्वरीचे विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अनंत (बाळा) नर यांनी अर्ज भरला. यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, शिवसेना जोगेश्वरी विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भायखळा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मनोज जामसुतकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेते सचिन अहिर, किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, काँग्रेसचे रवी बावकर, सोनम जामसुतकर, बबन गावकर, अॅड. मंगेश बनसोड उपस्थित होते.
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा, अनंत नर यांनी जोगेश्वरी, समीर देसाई यांनी गोरेगाव, मनोज जामसूतकर यांनी भायखळा मतदरसंघातून अर्ज दाखल केले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली, कणकवली मतदारसंघातून संदेश पारकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
दहिसर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी माजी आमदार विलास पोतनीस, तेजस्वी घोसाळकर, हर्षद कारकर, विभागप्रमुख उदेश पाटेकर, सुजाता शिंगाडे, काँग्रेसचे भूषण पाटील, संदेश काsंडविलकर, अशोक सुत्राले आदी उपस्थित होते.
– उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असला तरी ज्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे त्यांच्या प्रचाराचा धडाका उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रचाराचा धुमधडाका पाहायला मिळणार आहे. पदयात्रा, चौकसभा, रॅली, जाहीर सभा असे नियोजन सर्वच पक्षांनी केले आहे.
शेवटच्या दिवशी 6 हजार 658 अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज तब्बल 6 हजार 658 अर्ज दाखल करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबरला सुरू झाली होती. 29 ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राज्यात सर्वत्र अर्ज भरण्याची घाई दिसून आली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 288 मतदारसंघांत 7 हजार 995 उमेदवारांनी तब्बल 10 हजार 905 अर्ज भरले असून आता 4 नोव्हेंबरला लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.