डोंबिवली विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे आणि भाजपचे रवींद्र चव्हाण अशी दुरंगी लढत होणार आहे. तीन टर्म आमदार आणि मंत्री असूनही रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसाठी एकही भरीव काम केलेले नाही. सांस्कृतिक, सुसंस्कृत आणि सुशिक्षित अशी डोंबिवलीची असणारी ओळख विकासाच्या बाबतीत मात्र मागे राहिली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या विरोधात अँटी इन्कबन्सी असल्याने यापुढे आम्हाला निष्क्रिय आमदार नको अशी सार्वत्रिक ठाम भावना डोंबिवलीकरांमध्ये आहे. याचमुळे शिवसेनेचा आश्वासक तरुण चेहरा म्हणून निवडणूक रिंगणात असलेले दीपेश म्हात्रे यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या 15 वर्षांपासून भाजपचे रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री आणि रायगडचे पालकमंत्री अशी पदे भूषवली. मात्र या कार्यकाळात कोकण आणि डोंबिवलीसाठी दखल घेण्याजोगे त्यांनी केलेले एकही विधायक काम शोधूनही सापडत नाही. त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी डोंबिवलीला सर्वात घाणेरडे शहर असे म्हटले होते.
‘मशाल’ आमच्या हक्काची
दीपेश म्हात्रे यांनी नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणून कल्याण, डोंबिवलीच्या विकासासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. व्हिजन असलेला, सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सुशिक्षित तरुण राजकारणी अशी दीपेश म्हात्रे यांची ओळख आहे. त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांनी महापौर म्हणून लोकाभिमुख काम केले होते. डोंबिवलीकरांनी नेहमीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठबळ दिले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने ‘मशाल’ आमच्या हक्काची म्हणत डोंबिवलीकरांचा दीपेश म्हात्रे यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.