विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांनी तिकीट वाटप केले आहे. काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली, तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचे तिकीट कापले गेल्याचे दिसून येतेय. वाशिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले. त्यांच्या जागी आता भाजपने अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना वाशिममधून संधी दिली. लखन मलिक यांना तिकीट न मिळाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. ‘‘इमानदारीने पक्षाचे काम केले. मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. आमच्या नेत्यांनाच माहिती की, मला उमेदवारी का दिली नाही? पक्षाने माझ्यावर थोडातरी विश्वास ठेवायला पाहिजे होता. सर्व कार्यकर्त्यांना बोलावून माझी भूमिका मी स्पष्ट करेन,’ अशी प्रतिक्रिया लखन मलिक यांनी दिली.
वाशिम मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार लखन मलिक करीत होते. ते चार वेळा निवडून आले आहेत. वाशिममध्ये पक्षांतर्गत लखन मलिक यांच्याविषयी तीव्र नाराजी होती. त्यामुळे त्यांचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.