वार्तापत्र (कोपरी-पाचपाखाडी) – गद्दारी विरुद्ध निष्ठेची लढाई; शिवसेनेचे केदार दिघे यांचे खणखणीत आव्हान, मशाल तळपणार

‘शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना’ हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे समीकरण. पण प्रतिष्ठेची सर्व पदे भोगूनही एकनाथ शिंदे यांनी ‘मातोश्री’ शी दगाफटका करीत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बळकावली. एवढेच नव्हे तर 40 आमदारही फोडले. धनुष्यबाण हिसकावून घेतला. मात्र ठाणेकर जनतेला ही फोडाफोडी अजिबात सहन झालेली नाही. कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार तर गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज असून खुद्दारांना साथ देणार आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निष्ठावंत उमेदवार व धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. दिघे यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून कोपरी-पाचपाखाडीमधील ही लढत संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरत आहे.

कोपरी- पाचपाखाडी हा मुंबईच्या वेशीवरचा मतदारसंघ आहे. सुमारे साडेतीन लाखांवर अधिक मतदार असलेला हा भाग. एकनाथ शिंदे हे गेली 15 ते 20 वर्षे येथून निवडून येत आहेत. नगरसेवकपासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदे त्यांना मिळाली. पण स्वतःच्याच मतदारसंघाचा विकास ते करू शकले नाहीत. त्यामुळे येथील जनता कमालीची नाराज असल्याचे दिसून येत आहे. दहशतीमुळे सर्वसामान्य मतदार उघडपणे बोलत बसले तरी प्रत्यक्षात त्यांची खदखद दिसून येत आहे. एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा येथून निवडणूक लढवत आहेत. पण प्रथमच त्यांना निष्ठावान असलेल्या तरुण, तडफदार शिवसैनिकांशी मुकाबला करावा लागत आहे.

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात वाहतूककोंडी तसेच कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. अनेक ठिकाणी तर पिण्याचे पाणीदेखील पुरेशा प्रमाणात येत नाही. येथील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. कोपरीतील लाडक्या बहिणी व लाडके भाऊ गेले अनेक वर्षे अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. पण स्थानिक आमदार म्हणून शिंदे यांना त्यांच्या प्रश्नांकडे बघण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध प्रचंड रोष दिसून येत आहे.

वार्तापत्र (महाड) – मशाल धगधगणार; परिवर्तन घडणार, स्नेहल जगताप यांना वाढता पाठिंबा

दिघे यांचा मतदारांशी थेट संपर्क

कोपरी – पाचपाखाडीमधून प्रत्येक वेळेस सहजपणे निवडून जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना यावेळची निवडणूक सोपी राहिलेली नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांचे त्यांना तगडे आव्हान आहे. केदार दिघे हे सध्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख असून त्यांना स्थानिकांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. कोपरी – पाचपाखाडीमधील मतदारांशी ते थेट संपर्क साधत असून त्यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. त्यांच्या प्रचार सभांना तसेच रॅलींना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नव्या दमाच्या तरुणांची त्यांना चांगली साथ लाभली आहे. यावेळेस मशाल तळपणार आणि परिवर्तन घडवून आणणारच असा निर्धार करीत शिवसैनिक व महाविकासाकडचे कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने प्रचारात उतरले आहेत.

बगलबच्च्यांची गोची

एकनाथ शिंदे व त्यांचे गद्दार साथीदार आम्हीच धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे वारसदार आहोत, असे ऊठसूट सांगत असतात. पण प्रत्यक्षात दिघे यांचे पुतणेच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शिंदे यांच्या बगलबच्च्यांची चांगलीच गोची झाली आहे. आपण निवडून आल्यानंतर स्थानिक बेरोजगारांच्या तरुणांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवू, असे वचन शिवसेनेचे केदार दिघे यांनी दिले आहे. त्याशिवाय जुन्या इमारतींचा पुनर्विकास, पाणी प्रश्न, कचऱ्याची समस्या, नागरिकांना चांगली उद्याने, तरुणांना खेळाची मैदाने या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही दिघे यांनी म्हटले आहे.

वार्तापत्र – पनवेलमध्ये परिवर्तन घडणार, ‘दिखाऊ’ विकास भाजप आमदाराला भोवणार