कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने, मनसेचे गणेश भोकरे या प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दीड वर्षापूर्वी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करत भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कसब्याला सुरुंग लावला होता.
कार्यशैलीमुळे पोटनिवडणुकीत धंगेकर देशभरात पोहोचले होते. आता विधानसभेला तीन पक्षांच्या उमेदवारांसह कसब्यात अपक्षांची संख्या जास्त असली तरी महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रमुख लढत होणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळूनही विकास न झाल्याने कसब्यात नाराजी आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या अडचणीत तत्काळ पाठीमागे उभे राहणारा अशी धंगेकर यांची लोकप्रियता आजही टिकून आहे. त्यामुळे धंगेकर यांचा कसब्यात पुन्हा वरचष्मा राहणार का, हे निकालानंतर समोर येईल.
भाजपचे दिवगंत नेते गिरीश बापट यांनी सुमारे 1995 च्या विधानसभेत विजय मिळवत पुढील 25 वर्षे कसब्यावर आपली पकड कायम ठेवली. 2019 मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक या कसब्यातून आमदार झाल्या. त्यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा पराभव केला. तब्बल पंचवीसहून अधिक वर्षे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला. परंतु, दीड वर्षापूर्वीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या धंगेकरांनी भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.
महायुतीमधील भाजपची ताकद असली तरी या मतदारसंघात मिंधे गट आणि अजित पवार गटाची फारशी ताकद नाही. याउलट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आहे. महाविकास आघाडीचे चांगले संघटन आहे. आजवर बंडखोरी आणि अपक्षांच्या चालीने भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्याचे काम केल्याचे दिसून येते. पोटनिवडणुकीत आणि आता विधानसभेलाही कसब्यातून भाजपने धीरज घाटे, कुणाल टिळक, ब्राम्हण समाजाच्या मागणीचाही विचार केला नाही. त्यामुळे उघड नाराजीचा भडका उडाला. नेत्यांची नाराजी दूर झाली असली कार्यकर्त्यांच्या इच्छा-आकांक्षांचं काय? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
Assembly election 2024 – ‘पोर्शे’ची ‘धडक’ वडगाव शेरीत बसणार!