धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी आज भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कायम मातोश्रीच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी यावेळी दिली.
पन्नास खोके तसेच मंत्रीपदावर लाथ मारुन मातोश्री, जनतेशी एकनिष्ठ असलेले निष्ठावंत आमदार कैलास घाडगे – पाटील यांना शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने दुसर्यांदा संधी देण्यात आली आहे. आज सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करत आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. ही रॅली अण्णाभाऊ साठे चौक, धारासूर मर्दिनी मंदिर, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा, नेहरू चौक काळा मारुती मंदिर, संत गाडगे बाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसिल कार्यालया बाहेर आली. त्यानंतर आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे यांच्यासह काँग्रेसचे जेष्ठ नेते विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना बंडखोरी, फाटाफूट नवीन नाही. धाराशिव – कळंब मतदारसंघातील शिवसैनिक हा कायम मोतोश्री आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहणार्याच्या पाठिशी राहतो. २३ तारखेला विजयावर शिक्का मोर्तब होईल. माझ्या विरोधात विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. यावरुच मतदारसंघातील परिस्थिती लक्षात येते. या निवडणूकीत देखील ठाकरे सरकारच्या काळात केलेली विकासकामे हाच निवडणूकीतील प्रचाराचा मुद्दा असल्याचे कैलास पाटील यावेळी म्हणाले.