जरांगे पाटलांचं समर्थन मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवारानं स्वत:चंच वाहन जाळलं, असा उघड झाला काका-पुतण्याचा बनाव

निवडणुकीच्या काळामध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी उमेदवार कधी काय करेल याचा नेम नसतो. असाच काहीसा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला असून मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन आणि सहानुभूती मिळवण्यासाठी एका अपक्ष उमेदवाराने स्वत:ची चार चाकी जाळली. यानंतर अज्ञात व्यक्तीने आपले वाहन जाळले असा बनावही केला. मात्र पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच बनाव उघडकीस आला. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी उमेदवारासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नांदेडमध्ये विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातील 9 मतदारसंघात अनेकजण आपले भाग्य आजमावत आहेत. अपक्ष उमेदवारही रिंगणात असून कंधार तालुक्यातील करतळा येथील परसराम कदम यांनी मुखेड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मुखेड-बाऱ्हाळी रोडवर परसराम कदम यांनी पुतण्या अक्षय लहू कदम याच्या मदतीने स्वत:ची टाटा सफारी कार (क्र. एमएच 26 एल 2775) डिझेल टाकून जाळली. त्यानंतर काका-पुतण्याने मुखेड पोलिसांना फोन करून आमची गाडी अज्ञात व्यक्तीने जाळल्याची माहिती दिली.

घटना गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याशिवाय अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्यात आली. मात्र तपासादरम्यान संशय आल्याने पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी अक्षय कदम याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. खाकी वर्दीचा धाक दाखवताच काका-पुतण्याचा बनाव उघडकीस आला.

निवडणुकीत प्रसिद्धीसाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली काका-पुतण्याने दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुखेड पोलिसांनी अपक्ष उमेदवार परसराम कदम आणि त्यांचा पुतण्या अक्षय कदम या दोघा विरोधात कलम 287, 217, 324(4), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.