नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी सायंकाळी 6 वाजता रांगेत उभ्या असलेल्या सर्व लोकांना किती टोकन वितरित केले गेले, याची बुथनिहाय माहिती वंचित बहुजन आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली होती. मात्र संबंधित माहिती दैनंदिन पाकिटात बंद करून सुरक्षा जमा केली आहे. त्यामुळे ती देणे शक्य नाही, असे स्पष्ट करीत निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. मतदानासाठी सायंकाळी 6 वाजता रांगेत उभ्या असलेल्या सर्व लोकांना किती टोकन वितरित केले गेले? यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न पत्रातून विचारण्यात आले होते. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती उघड करण्यास नकार दिला. त्यावर वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर ‘पोकळ उत्तर’ म्हणावे लागेल, असे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.