उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यानंतर आता शरद पवार; बारामतीत बॅगा तपासल्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विरोधी पक्षनेत्यांची हेलिपॅडवर बॅग तपासणी सातत्याने सुरु आहे. शनिवारी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बॅग तपासण्यात आली, त्यानंतर आज रविवारी शरद पवार यांची बॅग तपासण्यात आली आहे.

नुकतेच वणी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याने तीव्र संताप व्यक्त होत असताना शनिवारी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बॅग तपासण्यात आली. तर आज रविवारी पुणे जिल्ह्यातील बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांची बॅग तपासली आहे. एका व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टरमधून बॅग बाहेर काढताना आणि त्याची तपासणी करताना दिसत आहेत. शिवाय बाजूला शरद पवार उभे असल्याचे त्या व्हिडीओत दिसत आहे.सोलापुरातील करमाळा निवडणूक रॅलीला जात असताना, बारामती हेलिपॅडवर त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या.

प्रत्यक्षात महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बॅगांसह हेलिकॉप्टरचीही तपासणी करण्यात येत आहे. झारखंडमध्ये राहुल यांचे हेलिकॉप्टर कथितपणे थांबल्याच्या विरोधात पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.