विधानसभा निवडणुकीमध्ये ‘ट्रम्पेट’ म्हणजेच ‘तुतारी’ चिन्ह घेऊन, तसेच नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार उभे करण्याची राजकीय खेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे फसली आहे. ईव्हीएमच्या मतपत्रिकेवर ‘तुतारी ‘ऐवजी आता ‘ट्रम्पेट’ असे नाव छापले जाणार आहे. तर, दुसरीकडे नवी शक्कल शोधून मतपत्रिकेवरील फोटोमध्ये प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चेहऱ्याशी साम्य असणाऱ्या व्यक्तीला अपक्ष म्हणून मते खाण्यासाठी उभे करण्याचा फंडा जिल्ह्यामध्ये झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे मराठी भाषांतर ‘तुतारी’ असे करून मतपत्रिकेवर छापल्यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मते या चिन्हाकडे गेली. परिणामी, अनेक उमेदवारांचा पराभव झाला. मात्र, निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ या चिन्हाचे मराठी भाषांतर न करता, ‘ट्रम्पेट’ असेच नाव मतपत्रिकेवर छापण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय अगदी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या टप्प्यात घेण्यात आला.
प्रतिस्पर्धी उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन, तसेच त्याचे नाव मतपत्रिकेमध्ये पहिल्या चार-पाच उमेदवारांच्या यादीमध्ये कसे येईल, याचीदेखील खबरदारी घेतली होती. मराठी अल्फाबेटिकल नावाप्रमाणे जुळणी केली होती. वडगाव शेरी, पर्वती याबरोबरच आणखी तीन ते चार विधानसभा मतदारसंघांमध्ये या पद्धतीने राजकीय खेळी करण्यात आली. मात्र, निवडणूक आयोगाच्या मतपत्रिकेवर चिन्हाचे नाव ‘ट्रम्पेट’ असेच छापण्याचा निर्णय झाल्याने मोठी तयारी करून शोधण्यात आलेल्या या उमेदवारांचा आता फारसा उपयोग होणार नाही.
Assembly election 2024 – आघाडीच्या मजबुतीसाठी शिवसेनेची त्यागाची भूमिका!
मतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो छापला जाणार आहे. या संधीचा फायदा घेऊन प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्ती शोधून, अगदी बाहेरच्या मतदारसंघांमधून आणून उभ्या करण्यात आल्या आहेत. जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचे नाव मतपत्रिकेवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हुबेहूब शेरकर यांच्यासारखाच चेहरा, दाढी-केसांची स्टाइल आणि चष्मा असणारी शिरूर तालुक्यातील ‘डमी’ व्यक्ती उमेदवार म्हणून उभी आहे. तिचे नाव मतपत्रिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.