काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवणारा काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत मात्र 20 जिह्यांतून अक्षरशः हद्दपार झाला आहे. शिवाय काँग्रेसच्या दिग्गजांचे गडही ढासळले आहेत. मतमोजणीचे चित्र स्पष्ट होईपर्यंत  काँग्रेसला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या अतुल भोसले यांनी त्यांचा पराभव केला. तर माजी मंत्री यशोमती ठाकूर यादेखील तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजेश वानखेडे यांच्या विरोधात पराभूत झाल्या. तसेच सलग सात वेळा निवडून आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरातही शिंदे गटाच्या अमोल खटाळ यांच्या विरोधात पराभूत झाले. दिग्गजांच्या पराभवामुळे काँग्रेसचे गड ढासळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

या जिह्यांत फटका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, धीरज विलासराव देशमुख, ऋतुराज पाटील, यशोमती ठाकूर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण या विद्यमान आमदारांसह शशिकांत शिंदे या दिग्गजांचा पराभव झाला. काँग्रेसला धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, धाराशीव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव या जिह्यांत फटका बसला.