उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असतानाही महायुतीमध्ये अनेक जागांवर पेच कायम आहे. वाशीममध्ये मिंधे-भाजपातील वाद चव्हाटय़ावर आला आहे. वाशीमच्या रिसोड मतदारसंघात मिंधे गटाच्या उमेदवार म्हणून माजी खासदार भावना गवळी यांना शुभेच्छा देणाऱया पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असतानाच भाजपच्या नेत्याने गवळींविरुद्ध दंड थोपटले आहेत. माजी मंत्री अनंतराव देशमुख हे उद्या भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार अशा पोस्टही फिरू लागल्याने महायुतीमधील कार्यकर्तेच बुचकळ्यात पडले आहेत.
रिसोडची जागा कोणाच्या वाटय़ाला येणार यावर महायुतीमध्ये अद्याप निश्चित झालेले नाही. रिसोड हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असल्याने त्यावर मिंधे आणि भाजपा असा दोघांचाही डोळा आहे. लोकसभेचे तिकीट कापले गेलेल्या माजी खासदार भावना गवळी यांना मिंधे गटाने नंतर विधान परिषदेवर घेतले. परंतु आता त्या विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी आग्रही आहेत आणि आपली उमेदवारीही निश्चित झाल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे भाजपकडून अनंतराव देशमुखही इच्छुक आहेत.
अनंतराव देशमुख यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळत नसल्याने त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ते माघार घेण्यास तयार नाहीत आणि गवळीही विधानसभेत जाण्यावर ठाम आहेत. अशा स्थितीत दोघांनाही उमेदवारी दिली गेली तर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणारा हा राज्यातील पहिला मतदारसंघ ठरणार आहे.