Maharashtra Assembly Election 2024 – अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर, नवाब मलिक, आजबे यांना पहिल्या यादीत स्थान नाही

अजित पवार गटाने निवडणुकीसाठी 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 32 विद्यमान आमदारांना स्थान देण्यात आले असले तरी नाशिक जिह्यातील निफाडचे आमदार दिलीप बनकर, पुण्यातील हडपसरचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे, अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक, बीडच्या आष्टीचे बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा समावेश नाही, तर भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना उमेदवारी नाकारून भाजपमधून आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

झिशान सिद्दिकी वेटिंग लिस्टवर

राष्ट्रवादीने अजित पवार यांच्यासह सर्व मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. विधानसभा उमेदवारी जाहीर झालेल्या मंत्र्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून उमेदवारी देण्यात आली आहे.