वार्तापत्र ऐरोली – बंडोबांमुळे नाईकांना टेन्शन; मढवींचे पारडे जड

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवल्यानंतर मिंधे गटाचे विजय चौगुले यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. चौगुले यांच्या बंडखोरीचा नाईक यांना जोरदार फटका बसणार आहे. महायुतीमधील या बंडामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार एम. के. मढवी यांच्या विजयाची वाट सोपी झाली आहे. याच मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षानेही आपला उमेदवार उतरवल्यामुळे नाईकांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

ऐरोली विधानसभा मतदारसंघावर गेल्या 15 वर्षांपासून नाईकांचे वर्चस्व आहे. यंदा या मतदारसंघात शिवसेनेचे एम. के. मढवी, भाजपचे गणेश नाईक आणि मिंधे गटाचे बंडखोर विजय चौगुले यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने अंकुश कदम यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नाईकांचा गड म्हणून ओळख असलेल्या कोपरखैरणे भागात कदम यांचा मोठा जनाधार आहे. परिणामी नाईकांचे मताधिक्य या भागात घटणार आहे.

2019 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून सहज जिंकली होती. त्यावेळी त्यांना कोणताही तगडा प्रतिस्पर्धी नव्हता. मात्र यंदा होणारी निडणूक ही 2009 आणि 2014 च्या निवडणुकीप्रमाणे अटीतटीची होणार आहे. या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला घणसोलीपर्यंत सुमारे सात हजार मतांची आघाडी होती. मात्र कोपरखैरण्यात घात झाल्याने शिवसेनेला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आता नाईक यांचा तंबू मोठ्या प्रमाणात रिकामा झाला आहे. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत नाईकांबरोबर असलेले त्यांचे अनेक शिलेदार आता बाहेर पडले आहेत. त्यातच विजय चौगुले यांनी बंडखोरी केली आहे. त्याचा फायदा शिवसेनेचे एम. के. मढवी यांना होणार आहे.

भूमिपुत्रांचा बदल घडवण्याचा निर्धार

नवी मुंबई शहर जरी भूमिपुत्रांच्या त्यागावर उभे राहिले असले तरी येथील भूमिपुत्रांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. मात्र संघर्षाच्या काळात भूमिपुत्रांच्या मागे सत्ताधारी खंबीरपणे उभे राहिले नाही. परिणामी शहराची निर्मिती होऊन अर्धशतक उलटले तरी गावठाण आणि विस्तारित गावठाणातील घरे नियमित झाली नाहीत. गणेश नाईक अनेक वर्षे सत्तेत होते. मात्र त्यांना हा प्रश्न मार्गी लावता आला नाही. त्यामुळे भूमिपुत्रांनी यंदाच्या निवडणुकीत बदल घडवण्याचा निर्धार केला आहे. परिणामी गावागावात एम. के. मढवी यांच्या प्रचार फेऱ्यांना आणि सभांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.