मोदींमुळे ‘हवाई’ ताप! हेलिकॉप्टरना उड्डाणाची परवानगी नाकारली, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रचारात अडथळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेसाठी सोलापूरला येणार असल्याने सोलापूर, लातूर आणि धाराशीव अशा तीन जिह्यांच्या हवाई क्षेत्रात अन्य कोणतेही विमान वा हेलिकॉप्टरच्या उड्डाण वा लँडिंगला आज काही तासांसाठी प्रतिबंध करण्यात आला. त्यामुळे प्रचार दौऱ्यावरील अनेक पक्षांच्या नेत्यांना मनस्ताप सहन करावा लागला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही त्यामुळे औसा येथे बराच वेळ खोळंबा झाला.

सोलापूर आणि लातूर जिह्यांत बरेच अंतर आहे, तरीही मोदींच्या सभेमुळे लातूरची हवाई हद्दही हवाई वाहतूक नियंत्रकांकडून प्रतिबंधित करण्यात आली. या हवाईकोंडीवर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला.

औसा येथील सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांना तिथून उमरगा येथील सभेला जायचे होते. मात्र मोदींचे विमान सोलापूरला येणार असल्याचे कारण देत औसा येथून उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास प्रशासनाकडून काही वेळ मनाई करण्यात आली.

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजेपंतप्रधानांच्या सभेत गोंधळ

पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळी तरुणाने घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, मराठा आरक्षण द्यावेच लागेल, अशा घोषणा देत व्हीव्हीआयपी रांगेत बसलेल्या तरुणाने गोंधळ घातला. तरुणाने मोदींच्या दिशेने हातवारे करून घोषणाबाजी केल्यामुळे सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत त्याला पोलीस ठाण्यात नेले.

 प्रशासनाचा कारभार एकतर्फी ः जयंत पाटील

प्रशासनाचा कारभार एकतर्फी आहे. पंतप्रधान मोदी प्रचाराला फिरताना त्यात कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी जसे प्रशासन घेते तसे इतर नेत्यांच्या बाबतीतही व्हायला हवे. मोदींनी कुठे जावे याबाबत आमची तक्रार नाही मात्र मोदींच्या सुरक्षेचे कारण देऊन एका पक्षाच्या प्रमुखांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणास परवानगी नाकारणे चुकीचे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला.