विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे सहा दिवस उरलेले असताना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मिंधे गट आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल बुधवारी या भागात सभा झाल्यांनतर पोलिसांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना ठाणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजप महायुतीचे सरकार असून गृहखाते भाजपकडेच आहे. त्यानंतरही मिंध्यांच्या इशाऱ्यावरून अशी कारवाई झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील भाजप पदाधिकारी संदीप माळी यांना बुधवारी मध्यरात्री तडीपारीची नोटीस देण्यात आली आणि आज दुपारी मानपाडा पोलिसांनी त्यांना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. माळी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असून सध्या ते मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.
विशेष म्हणजे बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात प्रचारसभा घेतली आणि त्याच सभेनंतर माळींना तडीपारची नोटीस मिळाली. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून ‘भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, तर दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांवरही अशीच कारवाई का केली जात नाही’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात अनेक गुंड असतानाही ते हद्दपार केले जात नाहीत, मात्र भाजपशासित राज्यात भाजप पदाधिकाऱ्यांवरच अशी कारवाई ऐन निवडणुकीत होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
लोकसभेला प्रमाणिकपणे केलेल्या कामाचे फळ मिळाले
लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रमाणिकपणे मिंधे गटाच्या उमेदवाराचे काम केले. त्याच कामाचे फळ मला आता मिळाले आहे. मात्र मी अशा धमक्यांना घाबरणार नाही. मनसेचे राजू पाटील हे माझे नातेवाईक आहेत. त्यांना मदत करतो या संशयावरून ही कारवाई माझ्यावर करण्यात आली आहे. माझे भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि आगरी समाजाला आवाहन आहे. वेळीच सावध व्हा, माझ्यावर जी वेळ आली आहे तीच उद्या तुमच्यावरही येणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी व्यक्त केली.