शेम… शेम…. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक–सत्ताधारी भिडले; कामकाज तहकूब; भैयाजी जोशींच्या विधानाचे विधिमंडळात तीव्र पडसाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांच्या विधानाचे तीव्र पडसाद राज्यासह विधिमंडळ अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षातील शिवसेनेच्या आमदारांनी या मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरले. शेम…शेम…शेम अशा घोषणा देत विरोधी बाकांवरील आमदारांनी जोरदार घोषणा दिल्या. भैयाजींवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न सत्ताधाऱयांनी केल्याने प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात 106 हुतात्मे झाले. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे, असे सांगत भास्कर जाधव यांनी भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याबद्दल सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण उदो उदो करतोय आणि दुसरीकडे मराठी भाषेचा अपमान करणे, मराठी सर्वांना आलीच पाहिजे असे नाही, असे वक्तव्य करणे असे प्रकार सुरू आहेत, याकडेही जाधव यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर देताना, मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला उभे राहिले असता सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर विरोधी बाकावरील आमदारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. गोंधळ झाल्याने विधानसभाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. परंतु त्यानंतरही सत्ताधारी आमदारांनी पातळी सोडून अर्वाच्य भाषा वापरल्याचे दिसले.

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले, आता गुजराती भाषा लादण्याचा प्रयत्न – अनिल परब

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले आता गुजराती भाषा मुंबईवर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईचे तुकडे करून मुंबई गुजरातमध्ये नेण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे, असा हल्ला शिवसेना गटनेते अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना केला. मराठी भाषेला दुय्यम दर्जाची वागणूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली आहे. आरएसएसला मराठी भाषेला, माणसाला डावलून मुंबईतील भागांचे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय असे भाषिक तुकडे करायचे आहेत. सरकारने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या अन्य सदस्यांनी वेलमध्ये येत सरकारने जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावरून झालेल्या गदारोळात सभागृहाचे कामकाज दोन वेळा 10-10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. मुंबईत येऊन आरएसएसचे भैयाजी जोशी असे कसे बोलू शकतात? हे मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आणि गिरगावची भाषा ही मराठी आहे. मुंबईतच अशा प्रकारे विभागाविभागात भाषा विभागली जाणार आहे का? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे हे असे वक्तव्य करणाऱया व्यक्तीला माहीत नाही का, काही काळानंतर मुंबईचा कारभार हा गुजराती भाषेत होणार आहे का, तसे संकेत सरकार देत आहे का, सरकार या सगळय़ाला खतपाणी घालतेय असे वाटतेय, असे सवाल काँग्रेसचे भाई जगताप यांनी केले.