
धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहे. तसेच वरळीतील दुध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही उद्योजकांना स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानीला देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला येतात आणि महाभ्रष्ट युती सरकार त्याचे पालन करत आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईसह महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारला दिला आहे.
अदानीच्या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, अदानीच्या धारावी प्रकल्पाबद्दल काँग्रेस पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही या मुद्द्यावर भूमिका जाहीर केलेली आहे. मात्र, भाजप सरकार मुंबईतील महत्वाचे व मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे टेंडर दुबईच्या एका कंपनीला मिळाले होते. पण नंतर ते रद्द करुन अदानीला देण्यात आले. महायुती सरकार हे गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा भाजपप्रणित शिंदे सरकारचा प्रयत्न काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही. राज्यातील जनतेत महायुती सरकारच्या या गुजरात धार्जीणेपणाबद्दल प्रचंड विरोध आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असे सांगत प्रदर्शन भरवले आहे. पण ही वाघनखे महाराजांची नाहीत. इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी लंडन म्युझियमला पत्र पाठवून त्याची माहिती घेतली असता म्युझियमने ते स्पष्ट केले आहे. असे असतानाही महायुती सरकारने जनतेचा पैसा खर्च करून सोहळा केला. ज्या लोकांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे जाहीर करुन 2017 मध्ये जलपूजनही केले मात्र अद्याप ते स्मारक अजून झालेले नाही. हेच लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात सर्वात पुढे होते. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोपही नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर घालून छत्रपती शिवाजी महाराजा अपमान केला आहे. तसेच नरेंद्र मोदी श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जगात अनेक राजे झाले पण छत्रपतीपद फक्त शिवाजी महाराजांचेच आहे. निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींच्या नावाने नकली वाघनखे आणून त्याचे प्रदर्शन करण्याचा महाभ्रष्टयुती सरकार अयशस्वी प्रयत्न करत आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली आहे. 10 वर्षापासून महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या भगिनींना 1500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाच्या योजनांची नावे बदलून त्या राबवल्या जात आहेत. संजय गांधी निराधार योजना, साजीव गांधी जनआरोग्य योजना यासरख्या विविध योजना काँग्रेस सरकारने आणल्या व जनतेला त्याचा लाभ दिला, असेही नाना पटोले यांनी सांगितले.