संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह दुर्घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करा बांधणी म्हणजे पोरखेळ नव्हे; राज्य सरकारलाही सुनावले

 ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहा’शी कोल्हापूरकरांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे या दुर्घटनेची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केली. तसेच ‘या ऐतिहासिक नाटय़गृहाची बांधणी म्हणजे पोरखेळ नाही. त्यामुळे राज्य सरकारनेदेखील याकडे गांभीर्याने पाहावे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले.

गुरुवारी (8 रोजी) ‘केशवराव भोसले नाटय़गृह’ आगीत भस्मसात झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ही ऐतिहासिक वास्तू पडद्याआड गेल्याने सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. ही ऐतिहासिक वास्तू पुन्हा होती तशी उभी राहावी यासाठी कोल्हापुरातील कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कला, सामाजिक आणि बांधकाम क्षेत्रांतील तज्ञ मंडळी उपस्थित होती. नाटय़गृहाची पुनर्बांधणी करताना राजर्षी शाहू महाराजांनी पूर्वी जशी वास्तू बांधली होती, त्यात कोणताही बदल न करता आहे त्या स्वरूपातच तातडीने बांधण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या नाटय़गृहाचे काम तातडीने होणे गरजेचे असले तरी ते आचारसंहितेत अडकण्याची शक्यता व्यक्त केली. पण या पुनर्बांधणीसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, याची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.

खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार

‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह’ जसेच्या तसे पुनर्बांधणीसाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करावी. यामध्ये कोणाला घ्यायचे, याचे सर्व अधिकार शाहू महाराजांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

संभाजीराजेंचा दम; पालकमंत्री मुश्रीफ गप्पगार

कोल्हापुरात कोणत्याही कामात ‘टक्केवारी’ची चर्चा काय कमी नाही. यामुळे या ऐतिहासिक नाटय़गृहाच्या पुनर्बांधणीवरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे थेट हातवारे करीत, ‘या पुनर्बांधणीत कमिशनचा घोळ झाल्यास सर्वांत आधी मी तुमच्या अंगावर येईन. कामात कोणताही गैरप्रकार झाल्यास मी तुम्हालाच जबाबदार धरणार,’ अशा शब्दांत संभाजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांना दम भरला. संभाजीराजेंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर मुश्रीफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता गप्पगार राहणेच पसंत केले.