महाराणी येसूबाई यांची समाधी राज्य संरक्षित स्मारक घोषित

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा, धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी व स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची माहुली येथील समाधी राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. या महत्त्वपूर्ण विषयाची अंतिम अधिसूचना बुधवारी (दि. 8) प्रसिद्ध झाली आली. सातारचे माजी उपनगराध्यक्ष व येसूबाई फाऊंडेशनचे संकल्पक सुहास राजेशिर्पे व जिज्ञासा विकास मंचचे नीलेश पंडित यांनी याकामी पाठपुरावा केला होता. यासंदर्भात सुहास राजेशिर्पे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये कुलमुखत्यार येसूबाई यांचे अभूतपूर्व योगदान आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर येसूबाई यांनी तब्बल 29 वर्षे शत्रूच्या नजरपैदेत काढले व त्यानंतर 1719 मध्ये त्यांचे साताऱयात आगमन झाले. हा सर्व इतिहास आजच्या पिढीला माहीत व्हावा, याकरिता संगम माहुली (सातारा) येथील येसूबाई यांची समाधी प्रयत्नपूर्वक कागदपत्रांच्या आधारे शोधून काढण्याचा संकल्प आपण सोडला होता. जिज्ञासा विकास मंचचे नीलेश पंडित यांची यात मोठी मदत झाली.