दलित, शोषित, पीडितांचे उद्धारकर्ता महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत पोचले आहेत. डोक्यावर सामानाची गाठोडी घेऊन, मजल दरमजल करत कुटुंबकबिल्यासह भीमसैनिकांचे जथे चैत्यभूमीच्या दिशेने जात आहेत. अवघा दादर परिसर ‘भीम’मय झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच चैत्यभूमीच्या बाहेर मोठी रांग लागली आहे. शिस्तबद्ध वातावरणात भीमसैनिक चैत्यभूमीवर नतमस्तक होताहेत. उद्या चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळणार आहे.
दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात भीमसैनिकांची गर्दी वाढली असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावले आहेत. प्रत्येक वर्षी चैत्यभूमीला न चुकता येणाऱ्यांसह नव्या पिढीतील तरुणही मुंबईत पोचत आहेत. निळे झेंडे, फिती, बाबासाहेबांचे फोटो असलेले बिल्ले घेऊन ‘जय भीम’च्या घोषणा देत अनुयायी चैत्यभूमीच्या दिशेने पोचत आहेत. मिळेल तिथे आसरा घेत आहेत. भाजीभाकरी खात आहेत. यामध्ये महिला, पुरुष, विद्यार्थी, वयोवृद्ध असे सगळेच आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही. कुणी लातूर, सोलापूरहून तर कुणी थेट मध्य प्रदेश, बिहारमधून आले आहेत. लेकराबाळांना खांद्यावर घेऊन अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात, शांततेत बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. त्यानंतर हिंदू कॉलनीतील राजगृहाला भेट देत आहेत.
चैत्यभूमी परिसरात नागपूरच्या उषा इंगोले यांचा स्टॉल आहे. पेन, पुस्तक, मूर्ती आदी साहित्यांची विक्री करतात. दोन दिवसांत चांगली विक्री होते, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर येथून आलेली लक्ष्मी सितारे प्लायवूड लॅमिनेशनचे फोटो तिथल्या तिथे तयार करून विकते. अगदी चपळतेने त्याचा डेमोही दाखवते. अगदी शंभर, दीडशे रुपयांपासून पुढे पह्टोंची किंमत आहे. ‘आमच्या घरचे सगळेच असे फोटो तयार करतात. मी आईकडून शिकले. मुंबईत आल्यावर दोन दिवसांत सगळा माल संपतो,’ असे लक्ष्मी सितारेने सांगितले.
वांद्रे येथील अर्चना राठोड मूर्तीकाम करते. चिनीमाती आणि पीओपीच्या मूर्ती तयार करून त्यांची विक्री करते. ‘आम्ही घरी साच्यामध्ये मूर्ती तयार करतो. फिनिशिंग आणि अन्य कामांसाठी पाच-सहा दिवस लागतात, असे अर्चनाने सांगितले. गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या मोठय़ा मूर्ती 300 ते 400 रुपयांना विकतो,’ असे अर्चनाने सांगितले.
पुस्तकांच्या स्टॉलवर गर्दी
चैत्यभूमी परिसरात आलेले अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांची पुस्तके खरेदी करत आहेत. महामानवाच्या प्रतिमा व पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॉलवर गर्दी दिसत आहे. याशिवाय फोटो, लॉकेट्स, निळ्या टोप्या, बिल्ले यांची खरेदीही जोरात आहे. पुस्तकांच्या स्टॉलवरही गर्दी आहे. आंबेडकर, बुद्ध, यांसह पुरोगामी विचारधारेची शेकडो पुस्तके येथे उपलब्ध आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी कुटुंबकबिल्यासह हजारो अनुयायी मुंबईत दाखल झालेत. एका ओढीने आपसूक पावले चैत्यभूमीकडे वळत आहेत. एका महिलेने हातावर बाबासाहेबांची स्वाक्षरी गोंदवून घेतली तर या चिमुकल्याने भीमरायांचा पुतळा उराशी कवटाळला. सारा परिसर भीममय झाला आहे.