
>>बाबासाहेब गायकवाड
दक्षिण गंगा पवित्र गोदावरी नदी हरवली आहे, तिचा शोध घेतला की, नालाच दृष्टीस पडतो. आम्ही गोदावरी कधीही स्वच्छ पाहिली नाही, असा संताप अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष, महंत रवींद्रपुरी महाराज यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात मूळ स्वरूप प्राप्त करून द्या, स्वच्छ पाण्याने गोदावरी प्रवाहित करा, असे साकडे त्यांनी सरकारला घातले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या महंत रवींद्रपुरी महाराज यांनी ‘सामना’शी संवाद साधला. नाशिक, त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हे नाव साधू-महंतांना मान्य नाही. त्र्यंबकेश्वर, नाशिक कुंभमेळा असेच संबोधले जाईल, असे आश्वासन आम्हाला मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे. तसे झाले नाही तर वादाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सर्वांना बरोबर घेऊन कुंभमेळा भव्य, दिव्य, सुंदर करण्याचा आमचा मुख्य हेतू आहे, असे ते म्हणाले.
मुख्य प्रश्न हा गोदावरी प्रदूषणाचा आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये आम्हाला आतापर्यंत गोदावरी नदी कधीही स्वच्छ दिसली नाही. फक्त पावसाळ्यात ती स्वच्छ पाण्याने वाहताना दिसते. त्र्यंबकेश्वरमधील पवित्र कुशावर्त कुंडावरून पुढे गेलो तर तेथे नदीच अस्तित्वात नाही, शोध घेतला तर नालाच दृष्टीस पडतो, असा संताप त्यांनी व्यक्त केला. जवळील धरणातील शुद्ध पाणी गोदावरीत सोडून कुंभमेळय़ासाठी ती स्वच्छ पाण्याने प्रवाहित करावी. मागील कुंभमेळय़ात आखाडय़ांसाठी जागेची मोठी अडचण निर्माण झाली होती, या वेळी प्रत्येकाला पुरेशी जागा द्यावी, अशा सूचना आम्ही सरकारला केल्या आहेत असे ते म्हणाले.
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करणे ही चूकच
महामंडलेश्वर करण्याची प्रत्येक आखाडय़ाची स्वतंत्र परंपरा आहे. सनातन धर्मासाठी चांगले काम करणाऱ्या योग्य व्यक्तीला हे पद दिले जाते. सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्याबाबत ते म्हणाले की, कधीकधी आमच्याकडूनही चुका होत असतात, परंतु असे लोक जास्त काळ थांबत नाहीत. ममता यांनी एक आठवडय़ात या पदाचा राजीनामा दिला. ही परंपरा आमच्यात नाही. परंतु त्यांनी ते केले असल्याने त्या आगामी कुंभमेळ्यात येणार नाहीत, असे वाटते. परंतु हा विषय त्यांच्या आखाडय़ाचा आहे, त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. जे संत असतात तेच येथे थांबतात, जे संत नसतात त्यांना देवच येथे थांबू देत नाही, असे महंत रवींद्रपुरी यांनी सांगितले.
…तर ‘कुशावर्ता’ऐवजी अन्य ठिकाणी शाहीस्नान
View this post on Instagram
यावेळचा कुंभमेळा हा पावसाळ्यात आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिले तर साधू-महंत आणि भाविकांची संख्या जास्त राहील. प्राचीन तीर्थराज कुशावर्त कुंडावर शाहीस्नानाची परंपरा आहे. लाखोंच्या संख्येने भाविक आले तर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कुशावर्ताऐवजी नदीघाटावर जेथे गोदावरी प्रवाहित राहील, त्या ठिकाणी शाहीस्नान करण्याचा प्रयत्न राहील, हे अद्याप निश्चित नाही. कुशावर्त कुंड हे शाहीस्नानाचे प्राचीन स्थळ आहे, ते सोडणे योग्य होणार नाही, असाही मतप्रवाह असल्याने हा निर्णय सर्व आखाडय़ांच्या सहमतीने घेतला जाईल, असे ते म्हणाले.