वर्षाअखेर सुट्ट्यांचा हंगाम आणि शालेय, महाविद्यालयीन सहलीमुळे कोल्हापूर ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पहाटेपासून भाविकांची तुडुंब गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, वर्षभरात श्री अंबाबाईच्या चरणी 12 कोटी 76 लाखांहून अधिक देणगी जमा झाली.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर देवस्थानकडील वार्षिक दानपेटीतील मोजदादाच्या तपशिलानुसार जानेवारी महिन्यात 1 कोटी 90 लाख 99 हजार 186 रुपये, फेब्रुवारी 97 लाख 21 हजार 828 रुपये, मार्च 1 कोटी 33 लाख 43 हजार 670 रुपये, मे 1 कोटी 98 लाख 8 हजार 290 रुपये, जुलै 1 कोटी 58 लाख 92 हजार 701 रुपये, सप्टेंबर 1 कोटी 84 लाख 4 हजार 70 रुपये, ऑक्टोबर 1 कोटी 14 लाख 43 हजार 210 रुपये व डिसेंबर महिन्यात आतापर्यंत 1 कोटी 98 लाख 92 हजार 383 रुपये, असे वर्षभरात एकूण 12 कोटी 76 लाख 5 हजार 338 रुपयांचे दान भक्तांनी दानपेटीत अर्पण केले, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली.