कुंभपर्वाचा शंखनाद; आज पहिले शाहीस्नान, संगम तटावर देशविदेशातील भाविकांची रिघ

आजपासून महाकुंभ पर्वाला सुरुवात झाली. पौष पौर्णिमेला तब्बल 44 घाटांवर देशविदेशातील भाविकांच्या भक्तीचा संगम झाला. हर हर महादेव, जय श्रीरामचा जयघोष करत भाविक घाटांवर दाखल होत होते. शंखनाद करत महाकुंभात आज दीड कोटी भाविकांनी अमृतस्नान केले. भाविकांवर 20 क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला. जर्मनी, ब्राझील, रशियासह 20 देशांतून भाविक दाखल झाले असून दर तासाला 2 लाख भाविक एकाच वेळी संगमात अमृतस्नान करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आजपासून 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात झाली असून उद्या 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या दिवशी पहिले शाहीस्नान होणार आहे.

संगमाच्या सर्व प्रवेश मार्गांवर भाविकांची तुंबळ गर्दी दिसली. वाहनांना प्रवेश बंद असून बस आणि रेल्वे स्थानकापासून 10 ते 12 किलोमीटर पायी चालत भाविक संगमावर पोहोचत आहेत. लष्कराचे तब्बल 60 हजार जवान तर 45 हजार पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात गुंतले आहेत. पोलीस स्पीकरच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने आलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करत आहेत. कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवानही ठिकठिकाणी तैनात असल्याचे दिसत आहे.

देश-विदेशातून भक्त कुंभमेळय़ात
दक्षिण आफ्रिका, स्पेन, जर्मनी, रशियासह अनेक देशांतील लोक महाकुंभमेळय़ात सहभागी झाले आहेत. हिंदुस्थान देश मला आधीपासून आवडतो, असे रशियाहून आलेल्या एका महिलेने सांगितले. कुटुंबासह जर्मनीहून आलेल्या एका एनआरआयने आनंद मिळत असल्याचे म्हटले. ते मूळचे म्हैसूरचे रहिवासी आहेत. गंगेत स्नान केल्यानंतर खूपच बरे वाटले. पवित्र स्नान केल्याने मनाला आनंद मिळाला, असे स्पेनहून आलेल्या एका भक्ताने सांगितले.

पंतप्रधानांचा सर्व भाविकांना नमस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून सर्व भाविकांना नमस्कार करत महाकुंभ पर्व सुरू झाल्यानिमित्ताने त्यांचे अभिनंदन केले. पौष पौर्णिमेला पवित्र स्नान करून प्रयागराजच्या पवित्र भूमीवर आजपासून महाकुंभ सुरू झाला आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित या दिव्य प्रसंगी मी सर्व भक्तांना मनापासून नमस्कार करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. हिंदुस्थानी आध्यात्मिकतेचा हा भव्य सण तुमच्या सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल, अशा भावना पंतप्रधानांनी एक्सवरून व्यक्त केल्या आहेत.

अदानी, अंबानींसह अनेक बडय़ा पंपन्या 70 टक्के करणार खर्च
जगातील सर्वात मोठय़ा या मेळ्यासाठी अदानी, अंबानी यांच्यासह अनेक बडय़ा पंपन्या प्रचंड पैसा खर्च करणार आहेत. प्रयागराज कुंभमेळ्यात एकूण 6 शाही स्नान होणार आहेत. पंपन्या त्यांच्या एकूण बजेटपैकी सुमारे 70 टक्के रक्कम या मेळ्यात खर्च करणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्पेटिंगचा प्रचार करण्यासोबत या पंपन्या ब्रँड एंगेजमेंटसाठी इन्फ्लुएन्सरची मदत घेत आहेत. एकूणच या पंपन्या आपल्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतणार आहेत.

प्रचंड गर्दीमुळे 250 हून अधिक कुटुंबापासून दुरावले
सर्व प्रवेशद्वारांवर भाविकांची तुफान गर्दी झाली. या गर्दीमुळे 250 हून अधिक लोक कुटुंबापासून दुरावले. परंतु, पोलीस आणि प्रशासनाने तत्काळ पावले उचलत हरवलेल्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मिलाप घडवून आणल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱयांनी दिली. कुंभमेळ्यात भुला-भक्त तसेच खोया-पाया पॅम्प उभारण्यात आले आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून हरवलेल्या आणि सापडलेल्यांच्या नोंदी ठेवण्यात येत आहेत. विशेषतः महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे.