प्रयागराजमधील महाकुंभमध्ये रुद्राक्ष माळा विकणारी मोनालिसा आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आली, परंतु हे सौंदर्य तिच्यासाठी शापित ठरले. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर महाकुंभमध्ये तिला भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत सेल्फी, फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली. यामुळे तिच्या धंद्यावर परिणाम झाला. रुद्राक्ष माळा विक्री होण्याऐवजी तिचा जास्त वेळ फोटो काढण्यात जाऊ लागल्याने तिच्या वडिलांनी तिला पुन्हा घरी पाठवले आहे. मूळची इंदूरची असणारी मोनालिसा भोसले कुंभमेळय़ात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती.
मोनालिसा महाकुंभ सोडून इंदूर झुसी परिसरात तिच्या कुटुंबाकडे परतली आहे. तिच्या वडिलांनी तिला घरी परत पाठवले आहे, तर मोनालिसाच्या अन्य दोन्ही बहिणी अजूनही कुंभमेळय़ात हार विकण्याचे काम करत आहेत. फुकट वेळ जात असल्याने मोनालिसाला परत पाठवले आहे.