प्रयागराजमध्ये आस्थेचा महाकुंभ भरला आहे! गंगेत डुबकी मारून पुण्य कमावण्यासाठी कोट्यवधी श्रद्धाळू येत आहेत. धर्मबुभाबरोबरच प्रयागराजमध्ये महागाईचा महाकुंभही भरला आहे. खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. साधी पोळीभाजी 750 रुपयांना मिळत असून, पाण्याची बाटली 100 रुपयांना झाली आहे. कपभर चहा 50 रुपयांना, तर आलूपराठ्यासाठी 400 रुपये मोजावे लागत आहेत!
144 वर्षानंतर प्रयागराज नगरीत महाकुंभाची पर्वणी आली आहे. मौनी अमावास्येच्या पावन पर्वावर गंगास्नानासाठी प्रयागराजमधील गंगाघाटावर मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. आता माघी पौर्णिमेलाही तेच चित्र आहे. देशाबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यातून श्रद्धाळू प्रयागराजकडे धाव घेत आहेत. प्रयागराजकडे येणारे सर्व रस्ते कित्येक किलोमीटरपर्यंत वाहतुकीने तुंबले आहेत. प्रयागराजमधील बाजारपेठेतही महागाईने अस्मान गाठले आहे. साध्या पाण्याच्या बाटलीसाठी 100 रुपये मोजावे लागत असून आलूपराठा 400 रुपयांना मिळत आहे. दालफ्राय 500 रुपये, तर एक कपभर चहा 50 रुपयांना विकला जात आहे. पोळीभाजी 750 रुपयांना मिळत असून इतर पदार्थाचे भावही आवाक्याबाहेर गेले आहेत.
बाईक टॅक्सीसाठी हजार रुपये
प्रयागराजमध्ये चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. स्थानिकांनी आपल्याकडील बाईक्सचा टॅक्सीसारखा वापर सुरू केला असून घाटापर्यंत पोहोचवण्यासाठी हजार रुपये घेण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी घराच्या छतावरच तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय केली असून त्या माध्यमातूनही रग्गड कमाई करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल कुंभव्यवस्थापनाची बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला.