उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या काळात महाकुंभ मेळा होणार आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह याने एक व्हिडीओ जारी करत धमकी दिली आहे. यामुळे प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी मार्गस्थ झालेल्या साधु-संतांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या एका हातात जपमाळ असून दुसऱ्या हातात भाला आहे. गुरपतवंत सिंह याच्यासारख्या माणसाला फोडून काढू, असा इशारा साधु-संतांनी दिला आहे.
गुरपतवंत सिंह याने महाकुंभला निशाणा बनवण्याची धमकी दिली होती. यावर साधु-संतांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय आखाडा परिषदेने पन्नूच्या धमकीचा समाचार घेतला. आखाडा परिषदेचे महंत रवींद्र पुरी यांनी पन्नू सारख्या लोकांना मातीत गाडून टाकू असे म्हटले.
साधु-संत गुरपतवंत सिंह सारख्या दहशतवाद्याला घाबरत नाहीत. सनातन धर्माचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. जो सनातन धर्माचा विरोध करत त्याच्या दोन हात करण्यासही आम्ही सज्ज आहोत. खलिस्तानी दहशतवादी पन्नू प्रयागराजला आला तर माघारी जाणार नाही. आम्ही सजग आहोत. आमच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात भाला असतो. पन्नूला आण्ही फोडून काढू. अशा दहशतवाद्याला धडा शिकवणे गरजेचे आहे, असेही पुरी म्हणाले.
दरम्यान, पीलीभीतमध्ये सोमवारी उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत खलिस्तान झिंदाबाद फोर्सचे तीन दहशतवादी ठार झाले. यानंतर गुरपतवंत सिंह याने एक व्हिडीओ जारी करत 14 जानेवारी, 29 जानेवारी आणि 3 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्यात होणाऱ्या शाही स्थान सोहळ्यात धुडगूस घालण्याची धमकी दिली होती.